शहराची वाढत जाणारी लोकसंख्या व पर्यायाने वाढणारे गुन्हे लक्षात घेता त्या तुललनेत सध्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. यावर तोडगा म्हणून ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना अधिक व्यापक प्रमाणात राबवून पोलिसांच्या कामामध्ये चांगल्या नागरिकांची मदत घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पोलीस महासंचालकांनी त्याबाबत सूचना दिल्या असल्याने आणखी पोलीस मित्रांचा शोध घेण्यात येत असून, या संकल्पनेत सहभागी होण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
वस्त्यांमधील गुन्हे रोखण्याच्या दृष्टीने पूर्वी पोलिसांकडून मोहल्ला कमिटय़ांची स्थापना करण्यात येत होती. ही संकल्पना अत्यंत प्रभावीही ठरली. मात्र, मागील काही दिवसांमध्ये गुन्ह्य़ांची पद्धत बदलत असल्याने मोहल्ला कमिटी ही संकल्पना आता मागे पडली आहे. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनीही पुणे भेटीमध्ये ही बाब अधोरेखित केली होती व पोलीस मित्र संकल्पना व्यापक प्रमाणात राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. सध्या रस्त्यावरील गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढीबरोबरच वाहतुकीच्या समस्याही वाढ आहेत. अशा परिस्थितीमध्ये पुणे व िपपरी- चिंचवड शहराचा विचार केल्यास सुमारे ७४ लाख लोकसंख्येसाठी केवळ दहा हजार पोलीस आहेत. अपुऱ्या मनुष्यबळाची ही समस्या पोलीस मित्र संकल्पनेतून काही प्रमाणात का होईना सुटू शकणार आहे.
पोलीस मित्रांना मार्गदर्शन करण्यासाठी व नव्याने पोलीस मित्र मिळविण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या वतीने शिबिरांचेही आयोजन करण्यात येत आहे. परिमंडल दोनच्या वतीने नुकतेच पोलीस मित्रांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या परिसरामधील अवैध कृत्य व गुन्हेगारी कारवायांच्या हालचाली पोलिसांना कळविण्याचे काम पोलीस मित्रांकडून अपेक्षित आहे. त्यातून गुन्हेगारीला मोठय़ा प्रमाणावर आळा बसू शकतो, असे या वेळी अपर पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी सांगितले. पोलीस मित्राच्या या संकल्पनेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने पोलिसांना प्रामाणिकपणे मदत करण्याची इच्छा असणारे चांगल्या वर्तणुकीच्या नागरिकांची पोलीस मित्र म्हणून आवश्यकता आहे. नुकत्याच झालेला गणेशोत्सव, नवरोत्रोत्सव, ईद आदी सणांमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस मित्रांची पोलीस दलाला मोठी मदत झाली होती. पोलीस मित्रांची संख्या वाढल्यास व प्रत्येक विभागामध्ये पोलीस मित्र कार्यरत झाल्यास संशयास्पद गोष्टींची माहिती पोलिसांपर्यंत तातडीने पोहोचून गुन्हेगारीला आळा घालता येईल, असा विश्वास पोलीस दलाकडून व्यक्त करण्यात येत आहे.