पुणे : मैत्रिणीकडून होणाऱ्या छळामुळे जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने नवले पुलाजवळील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.कार्तिक बाबू शेट्टीयार (वय ३४, रा. संतोषनगर, कात्रज) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कार्तिक याचा भाऊ तंगराज बाबू शेट्टीयार (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक हा जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. तरुणी ही नृत्याचे कार्यक्रम करते. दोघांमध्ये मैत्री झाली. ३० एप्रिल रोजी दोघे नवले पुलाजवळील एका लॉजमध्ये गेले होते. दोघांमध्ये वाद झाल्यावर कार्तिकने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कार्तिकचे नातेवाईक आणि मित्रांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होेते. याबाबत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
कार्तिकच्या सांगण्यावरून त्याच्या मित्रांनी तरुणीला पैसे दिले हाते. तरुणीबाबतची माहिती तंगराज यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत कार्तिककडे विचारणा केली. तेव्हा संबंधित तरुणी ही मैत्रीण असल्याचे त्याने तंगराज यांना सांगितले होते. तरुणी त्रास देत असून, तिच्या त्रासामुळे आत्महत्या करावे लागेल, असे कार्तिकने तंगराज यांना सांगितले होते. कार्तिक याच्या आत्महत्येस तरुणी जबाबदार असल्याचे तंगराज यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.