पुणे : ‘श्री’ नावाच्या मादी कासवाची प्रकृती गेल्या दोन महिन्यांपासून खालावली होती. त्याला क्रॉनिक एग-बाइंडिंग सिंड्रोम म्हणजेच यकृताचा आकार वाढणे आणि हिमोग्लोबिनची कमतरता अशा समस्या होत्या. त्यामुळे त्याला अंडी घालणेही अशक्य झाले होते. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी मादी कासवावर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत कासवाच्या अंडाशयातून चार पूर्णत: तयार झालेली अंडी बाहेर काढण्यासह त्याचा जीव वाचला आहे. ते आता बरे होऊन पुन्हा चालू लागले आहे.

तळेगावजवळील सोमाटणे येथे राहणाऱ्या एका कुटुंबीयांचे पाळीव कासव आहे. नेहमी सक्रिय असणारे ‘श्री’ कासव गेल्या काही महिन्यांपासून अचानक सुस्त झाले. या कासवाने आहाराचे सेवनही बंद केले. या कासवाच्या अंडी बाहेर पडण्याच्या जागेस सूज आल्याने ते अस्वस्थ होत असल्याचे दिसून आले. कासव अंडी बाहेर ढकलण्याचा खूप प्रयत्न करत होते, परंतु त्याला ते शक्य होत नव्हते. या कासवाला पुण्यात डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या द स्मॉल ॲनिमल क्लिनिकमध्ये नेण्यात आले. तिथे त्याच्यावर काही चाचण्या करण्यात आल्या. या तपासणीत कासवाला ‘एग बाइंडिंग’ म्हणजेच अंडी बाहेर काढू न शकण्याचा त्रास असल्याचे लक्षात आले. या स्थितीत कासव नैसर्गिकरित्या अंडी देऊ शकत नाहीत.

कासवाच्या अल्ट्रासाऊंड तपासणीमध्ये यकृताचा वाढलेला आकार आणि पूर्णपणे तयार झालेली अंडी दिसून आली. रक्त चाचण्यांमध्ये या कासवाची हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याचे आढळले. सुरुवातीला डॉक्टरांनी एपिडोसिन इंजेक्शनने अंडी बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. कासवाने खाणे बंद केल्याने तिची शक्ती टिकवून ठेवण्यासाठी तिला हाताने खायला देण्यात आले. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी तिची प्रकृती स्थिर करण्यासाठी काही औषधे देण्यात आली.

याबाबत डॉ. नरेंद्र परदेशी म्हणाले, ‘कासवाची शस्त्रक्रिया करताना तिला उबदार ठेवण्यासाठी खाली एक हीटिंग पॅड ठेवण्यात आला. शस्त्रक्रियेदरम्यान, गर्भाशयाच्या उजव्या मागच्या पायाजवळील एक लहान छिद्र पाडून अंडाशयामध्ये हळूवारपणे प्रवेश केला गेला आणि चार पूर्णपणे तयार झालेली अंडी काढण्यात आली. त्यानंतर अंडाशयही काढून टाकण्यात आले. अशा प्रकरणांमध्ये अंडाशयातून अंडी काढण्यासाठी कासवाचे कवच कापावे लागते. या प्रकरणात आम्ही प्रसंगावधान राखून शस्त्रक्रिया केल्याने त्याचे कवच वाचवता आले.’

शस्त्रक्रियेनंतर आम्हाला कासवाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. ती सक्रिय आणि उत्साही दिसू लागली. तिची हिमोग्लोबीनची पातळी सुधारण्यासाठी लशीची मात्रा देण्यात आली. त्यासोबतच बरे होण्यास मदत करण्यासाठी तिला तोंडावाटे पोषक आहार देण्यात आला. आता हे कासव पूर्वीप्रमाणे चालू लागले आहे.- डॉ. नरेंद्र परदेशी, पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक