पुणे : लालचुटूक स्ट्रॉबेरीचा हंगाम बहरात आला असून फळबाजारात स्ट्रॉबेरीची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. आवक वाढल्याने स्ट्रॉबेरीचे दर आवाक्यात आले आहेत. वाई, महाबळेश्वरसह यंदा नाशिक जिल्ह्यातूनही स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे.

थंडी पडल्यानंतर लालचुटूक स्ट्रॉबेरीची आवक सुरू होते. दरवर्षी साधारणपणे दिवाळीच्या आसपास स्ट्रॉबेरीची आवक सुरू होते. यंदा ऑक्टोबर महिन्यात पावसाच्या तडाख्यामुळे वाई, महाबळेश्वर, भिलार भागातील स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले. हंगामाच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरीची आवक कमी प्रमाणावर झाली. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे दर तेजीत होते. त्यानंतर गेल्या काही पंधरवड्यापासून फळबाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली असून दरात घट झाली आहे. स्ट्रॉबेरीला मागणीही चांगली असल्याचे मार्केट यार्डातील स्ट्रॉबेरी व्यापारी सुभाष राऊत यांनी दिली.

मार्केट यार्डातील फळबाजारात वाई, सातारा, भिलार तसेच नाशिक जिल्ह्यातून एकूण मिळून पाच हजार प्लास्टिक ट्रेची आवक होत आहे. एका ट्रेमध्ये साधारणपणे आठ प्लास्टिकची छोटी खोकी (पनेट) असतात. एका पनेटमध्ये २५० ग्रॅम स्ट्रॉबेरीची फळे असतात. एका ट्रेमध्ये पावणेदोन किलो स्ट्रॉबेरीची फळे असतात. एका ट्रेची किंमत प्रतवारीनुसार १५० ते ३५० रुपये दरम्यान आहे. स्ट्रॉबेरीची प्रतवारी चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिकमधील स्ट्रॉबेरी बाजारात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात स्ट्रॉबेरीची लागवड सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. स्ट्रॉबेरीची रोपे नाजूक असतात. हवामानातील बदलाचा परिणाम स्ट्रॉबेरीवर होतो. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. या भागातील शेतकरी मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज स्ट्रॉबेरी विक्रीस पाठवत आहेत. स्ट्रॉबेरीची एकूण आवक विचारात घेता ५० टक्के आवक नाशिक भागातून होत आहे. नाशिक भागातील स्ट्रॉबेरी लागवडीस यश आले आहे. नाताळात स्ट्रॉबेरीला मागणी वाढणार असून दरातही वाढ होण्याची शक्यता श्री छत्रपपती शिवाजी मार्केट यार्डातील स्ट्रॉबेरी व्यापारी सुभाष राऊत यांनी व्यक्त केली.