शिवसेनेतील बंडखोरीनंतर केवळ सरकारच पडलं नाही, तर शिवसेना कोणाची असा प्रश्न उपस्थित झाला. हा वाद सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगातही गेलं. सर्वोच्च न्यायालयाने पक्षचिन्ह आणि पक्ष कोणाचा हा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपावला. त्यानंतर निवडणूक आयोगात या प्रकरणी सुनावणी होत आहे. अशातच आयोग शिवसेना कोणाची यावर निर्णय देण्याची शक्यता आहे. या घडामोडींवर कायदातज्ज्ञ उल्हास बापट यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ते मंगळवारी (१७ जानेवारी) टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

उल्हास बापट म्हणाले, “कलम १५ अंतर्गत दोन गट झाले तर त्यातील जो गट मान्य होईल त्याला चिन्ह दिलं जातं. मात्र, निवडणूक आयोगाला दोघांचंही निश्चित सिद्ध होत नाही असं वाटलं, तर दोघांनाही चिन्ह दिलं जात नाही. मला वाटतं आत्ता निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय देऊ नये. कारण १६ आमदार अपात्र आहेत असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, तर निवडणूक आयोगाचा आत्ताचा निर्णय हास्यास्पद ठरेल. कपिल सिब्बल यांनी हाच मुद्दा मागच्यावेळी निवडणूक आयोगातील सुनावणीत मांडला होता.”

हेही वाचा : नाशिक पदवीधर मतदारसंघात सहा उमेदवारांची माघार, १६ उमेदवार रिंगणात, वाचा संपूर्ण यादी…

“१६ आमदार अपात्र ठरले, तर उरलेले आमदारही अपात्र होतील”

“मला व्यक्तिगत असं वाटतं की, आधी निवडणूक आयोगाने १६ आमदार पात्र आहेत की अपात्र आहेत हे बघितलं पाहिजे. १६ आमदार अपात्र ठरले, तर उरलेले आमदारही अपात्र होतील. म्हणजे ४० आमदार अपात्र होतील. अशावेळी शिवसेना पत्र कोणाचा ठरणार? त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आधी लागला पाहिजे आणि नंतर निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय दिला पाहिजे. तोपर्यंत या प्रकरणाचा निकाल निवडणूक आयोगाने राखून ठेवला पाहिजे,” असं मत उल्हास बापट यांनी व्यक्त केलं.

नेमकं प्रकरण काय?

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदार आणि १३ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. मात्र, एवढा मोठा गट फुटून बाहेर पडल्यामुळे खरी शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाची की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाची? हा वाद निर्माण झाला. त्यासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या गटानं निवडणूक आयोगासमोर केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असून त्यावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद केला जात आहे.

‘उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या घटनेत केलेले बदल बेकायदेशीर’

१३ खासदार आणि ४० आमदारांसह अनेक राष्ट्रीय आणि राज्य कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा करत आपल्यालाच पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मिळावं, अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या गटानं केलं आहे. तसेच, उद्धव ठाकरंनी बाळासाहेब ठाकरेंनंतर पक्षाच्या घटनेत बदल करून स्वत:ची पक्षप्रमुखपदी केलेली निवड आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे स्वत:कडे घेतलेले अधिकार बेकायदेशीर असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी आयोगासमोर केला आहे.

हेही वाचा : Photos : “आम्ही ‘ऑपरेशनला’ सुरुवात केली होती, पण…”, शिवसेनेतील फुटीवर गिरीश महाजन यांचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, एकीकडे शिंदे गटाकडून असा दावा करण्यात आला असताना दुकरीकडे ठाकरे गटाकडूनही आपली बाजू जोरकसपणे मांडली जात आहे. काही बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंची पक्षाध्यक्षपदी निवड २०१८मध्येच झाली होती. त्यांची मुदत २३ जानेवारी रोजी संपणार असून पक्षांतर्गत निवडणुकांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगासमोर करण्यात आली आहे.