पुणे : ‘आरक्षणाचा लाभ घेतलेल्या पिढीने आपला स्वार्थ पाहिल्याने बाकी समाज आहे तिथेच राहिला. जातींचे संघटन करून ‘बळी तो कान पिळी’ या म्हणीनुसार राजकीय सत्तेमध्ये वाटा आणि सोयी-सुविधांचा लाभ घेत आहे. त्यामुळे ‘नाही रे’ समाज आणखी तळामध्ये जात असून, त्यांना कोणीच वाली नाही, हे सध्याचे सामाजिक आणि राजकीय वास्तव आहे,’ असे स्पष्ट मत ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी व्यक्त केले.
भटक्या विमुक्त समाजाच्या व्यथा-वेदना, अन्याय आणि अत्याचाराला ‘उचल्या’ या आत्मकथनाद्वारे तीन तपांपूर्वी वाचा फोडण्याचे काम करणारे लक्ष्मण गायकवाड यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने ‘लोकसत्ता’शी साधलेल्या संवादामध्ये गायकवाड बोलत होते.
‘विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती झाली असली, तरी ‘उचल्या’ लिहिले त्या काळातील स्थिती आणि सध्याची परिस्थिती यामध्ये फार फरक पडलेला नाही,’ याकडे लक्ष वेधून गायकवाड म्हणाले, ‘अनेक जाती-जमातींना आरक्षणाचे लाभ मिळाले असले, तरी पारधी, नंदीबैलवाले, डवरी समाज अजूनही परिघाबाहेरच आहे. संघटित जाती-जमाती आणि राजकीय प्रभाव असलेल्यांना भटक्या-विमुक्तांच्या नावाखाली सत्तेमध्ये वाटा आणि प्रतिष्ठा मिळाली.
‘समाज माध्यमांमुळे अभिव्यक्तीचा विस्फोट झाला असून, हे लोकशाहीकरण आहे, असे म्हटले जाते खरे. पण, त्यातून लेखन, वाचन, मनन या पारंपरिक गाष्टींकडे आपले दुर्लक्ष होत आहे. नवतंत्रज्ञानाला जुन्या पद्धतीशी जोडून घेणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग हा ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी झाला पाहिजे. पण, दुर्दैवाने त्यातून जातीय, धार्मिक अस्मिता टोकदार बनत आहेत. समाजामध्ये अंधश्रद्धा पसरविण्यासाठी त्याचा उपयोग करणे धोक्याचे आहे. अशा वेळी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे काम करून साहित्याने मानवतेचा पुरस्कार केला पाहिजे,’ अशी अपेक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.
पुरस्कार सोहळा २७ मे रोजी
‘उचल्या’ या लक्ष्मण गायकवाड यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनी, २७ मे रोजी परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अध्यक्ष डाॅ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गायकवाड यांच्या पहिल्याच साहित्यकृतीला १९८८ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. ‘उचल्या’चे हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगू आणि ऊर्दूमध्ये अनुवाद झाला असून, या पुस्तकामुळे भारतातील लोकांना ‘डिनोटिफाइड ट्राइब्ज’ जमातीच्या वेदना प्रथमच समजल्या. भारतातील अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये समावेश झालेल्या ‘उचल्या’वर पीएच. डी. करून काहींनी डाॅक्टरेट मिळविली आहे.