पुणे : सरकारचा नाकर्तेपणा आणि शहरांमधील बेजबाबदार नागरिकांमुळे पाणीसमस्या उद्भवली आहे. मोठ्या शहरांमध्ये पाण्याचा अपव्यय सुरू राहिल्यास खेड्यापाड्यांमधील भेडसावणारा भीषण पाणीप्रश्न भविष्यात शहरांमध्ये निर्माण होऊ शकतो, असा इशारा निवृत्त सनदी अधिकारी आणि भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सोमवारी दिला. पाणीटंचाईची भीषण परिस्थिती समजून न घेता पुणे-मुंबईसारख्या शहरातील नागरिक अमाप आणि अयोग्य पद्धतीने पाणी वापर करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.पाणीविषयक मोलाचे कार्य करणारे नाशिक येथील ‘गोदाप्रेमी समिती’चे अध्यक्ष देवांग जानी यांना ‘रंगत-संगत प्रतिष्ठाना’च्या काव्य विभागातर्फे लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी देशमुख बोलत होते. प्रतिष्ठानाचे अध्यक्ष प्रमोद आडकर, काव्य विभागाच्या प्रज्ञा महाजन या वेळी उपस्थित होत्या.
देशमुख म्हणाले, ‘मानवाने प्रत्येक नदीशी खेळ केला आहे. नदी कोरडी होणे म्हणजे जणू स्त्रीची अब्रू घेणे आहे. जसजशी शहरे श्रीमंत होत गेली तसतशा नद्या कोरड्या पडत गेल्या. हे समजून घेताना नदीने आत्महत्या केली, की दुराग्रही माणसाने तिचा खून केला याचा विचार होणे आवश्यक आहे. लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची गरज व तहान वाढली आहे. परंतु पिण्याचे पाणी हे अक्षय नाही. पाणी वापराबरोबरच त्याचे पुनर्भरण होते की नाही याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. पाणी मुबलक आहे म्हणून उधळू नका.
विहिरी, तलाव, हौद, उपनद्या पुनर्जीवित कराव्यात.’
देवांग जानी म्हणाले, ‘नाशिक महापालिकेने गोदावरी पात्रातील १७ प्राचीन कुंडे बुजविल्याने नदीतील जिवंत पाण्याचे स्रोत नष्ट झाले होते. त्याविरुद्ध शासनाशी लढा देत नदीपात्रातील पाच कुंडांतील सुमारे पाच लाख किलो सिमेंट काढण्यात यश आले. त्यातून स्रोत जिवंत झाले. गोदावरी नदी ही नाशिक शहराचे हृदय आहे तर उपनद्या म्हणजे वाहिन्या आहेत. निसर्गाकडून आपण फक्त ओरबाडून घेत आहोत. त्याला परत काहीच देत नाही, ही मानवाची मोठी चूक आहे. नद्या निसर्गनिर्मित आहेत, त्यांच्यात मानवी हस्तक्षेप वर्जित आहे.’
पुणे शहरात मुबलक पाणी उपलब्धी आहे म्हणून त्याचा अविवेकी वापर केला जात आहे. याविषयी जागृती करूनही पुणेकर पाण्याचा निष्काळजीपूर्वक वापर करीत आहेत. आम्ही पैसे देतो त्यामुळे आम्हाला पाहिजे त्या वेळी आणि पाहिजे तेवढे पाणी मिळावे अशी पुणेकरांची हट्टी भूमिका आहे.- लक्ष्मीकांत देशमुख, अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती