जगदीश मुळीक आणि राजेश पांडे यांच्याकडे वेगवेगळी जबाबदारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आगामी महापालिका निवडणूक शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली की संघटन सरचिटणिसांच्या नेतृत्वाखाली लढविणार, याबाबत भाजपमध्ये संघर्ष सुरू असला तरी निवडणुकीचे नेतृत्व चंद्रकांत पाटील गटाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि संघटन सरचिटणीस राजेश पांडे या दोघांकडे निवडणुकीसंदर्भात वेगवेगळी जबाबदारी असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

आगामी महापालिका निवडणुकीत खरी लढत ही सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात होणार आहे. त्यामुळे निवडणुकीतील भाजपची सूत्रे कोणाकडे राहणार याबाबत भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात उत्सुकता होती. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाईल आणि महापालिकेतील एका पदाधिकाऱ्याला सहप्रभारी म्हणून संधी मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. खासदार गिरीश बापट यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी स्पष्ट केले होते. मात्र निवडणुकीची जबाबदारी चंद्रकांत पाटील गटाकडेच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

खासदार गिरीश बापट, सभागृहनेता गणेश बीडकर, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यापैकी एकाकडे निवडणुकीची सूत्रे जातील, अशी शक्यता व्यक्त होत असतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांचे नाव निवडणूक प्रचारप्रमुख म्हणून जाहीर केले. राजेश पांडे हे चंद्रकांत पाटील यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. दरम्यान, पांडे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर काही तासांतच शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नावाची निवडणूक प्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली. मुळीक यांच्याच अध्यक्षतेखाली निवडणूक लढवली जाईल आणि भाजपचे महापालिकेत स्पष्ट बहुमत असेल, असे सांगण्यात आले. राजेश पांडे यांची नियुक्ती निवडणूक संचालन समितीचे प्रमुख म्हणून करण्यात आली आहे, असा दावाही शहर भाजपकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आला.

दरम्यान, कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी शहराची सूत्रे ताब्यात घेतली आहेत. राजेश पांडे हे त्यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. पक्षाच्या बैठकीत जगदीश मुळीक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असली तरी पांडे यांच्याकडेच निवडणूक पदाची प्रमुख जबाबदारी राहील, असे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले. पांडे यांच्याकडे जबाबदारी असल्याने चंद्रकांत पाटील यांच्याच हाती निवडणुकीची सर्व सूत्रे राहणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leadership belongs to chandrakant patil group different responsibilities ysh
First published on: 01-03-2022 at 00:37 IST