शिरूर : शिरूर शहरातील नदीकाठी असणाऱ्या अमरधाम, सुशीला पार्क आणि सूरज नगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने बिबट्याला पकडण्यासाठी नियोजन केले आहे. सूरज नगर परिसरात पिंजरा लावण्यात आल्याची माहिती शिरूर तालुका वनाधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी दिली.
मागील दोन दिवसांपासून स्थानिक नागरिकांना बिबट्या आढळून आला आहे. नदीकाठी असणारे सूरज नगर, खारे मळा, शनी मंदिर, लाटेआळी, कुंभार आळी, हल्दी मोहल्ला या भागात बिबट्या आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने गस्त वाढविली आहे.
वन विभागाच्या गस्ती पथकांनी बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सूरज नगर परिसरात पिंजरा बसविण्यात आला असल्याचे तालुका वनाधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी सांगितले. गटविकास अधिकारी महेश डोके, शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्याशी समन्वय साधून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या वावर वाढला आहे. ग्रामीण भागात वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. दहा दिवसांपूर्वीच जांबूत येथे बिबट्याच्या हल्ल्यात भागुबाई रंगनाथ जाधव (वय ७२) यांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी पिंपरखेड येथील शिवन्या बोबे या साडेपाच वर्षांच्या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आतापर्यंत शिरूर तालुक्यातील विविध भागांमध्ये झालेल्या हल्ल्यांमुळे १० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे.
