संजय जाधव, लोकसत्ता

पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्राच्या स्मार्ट कार्डचा तुटवडा आहे. यामुळे परिवहन विभागाने नवीन कंपनीशी करार केला असून, ही कंपनी केवळ मुंबई, नागपूर, औरंगाबाद या तीनच ठिकाणी स्मार्टकार्डची छपाई करणार असून, त्यातून पुणे वगळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याला परिवहन आयुक्तांनीही दुजोरा दिला आहे.

राज्यभरातील आरटीओमध्ये सध्या स्मार्ट कार्ड तुटवडा आहे. वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहननोंदणीच्या स्मार्ट कार्डसाठी नागरिकांना तब्बल दोन महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे परिवहन विभागाने स्मार्टकार्ड छपाई करणाऱ्या आधीच्या कंपन्यांशी असलेला करार संपुष्टात आणून कर्नाटकातील मणिपाल टेक्नॉलॉजीज कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी येत्या २१ तारखेपासून स्मार्ट कार्ड छपाई सुरू करणार आहे. तोपर्यंत आधीच्या कंपन्या ही छपाई करणार आहेत.

आणखी वाचा-राज्य हिवताप, डेंग्यूने फणफणले! गडचिरोली, मुंबईत सर्वाधिक रुग्ण

राज्यातील केवळ मुंबई, नागपूर आणि पुणे या तीनच आरटीओंमध्ये स्मार्ट कार्डवर तपशील छापण्याची सुविधा असणार आहे. स्मार्टकार्ड छपाईत पुण्याला वगळण्यात आल्याने मोठा गदारोळ सुरू आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. याचबरोबर पुण्यातील अनेक संघटनांनी या प्रकरणी मोहीम हाती घेतली होती. तरीही अखेर पुण्याची निवड स्मार्टकार्ड छपाईसाठी झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त विवेक भीमनवर म्हणाले की, स्मार्टकार्ड छपाई कुठे करायची हा संबंधित कंपनीचा अधिकार आहे. त्यांच्या सोयीनुसार त्यांनी मुंबई, नागपूर, औरंगाबाद या तीन ठिकाणांची निवड केली आहे. या ठिकाणांची निवड करण्यात परिवहन विभागाचा कोणताही हस्तक्षेप नाही. कुठल्याही ठिकाणी छपाई झाली तरी राज्यातील व्यक्तीला स्मार्ट कार्ड स्पीड पोस्टाने त्याच्या घरी आधीप्रमाणेच पोहोचविले जाणार आहे. नवीन स्मार्टकार्डच्या रासायनिक तपासणी पूर्ण झाली असून, २१ ऑगस्टपासून त्यांची छपाई सुरू होईल.

आणखी वाचा- …असा उभारला दहा महिन्यांत चांदणी चौक उड्डाणपूल

स्मार्ट कार्डच्या छपाईची जबाबदारी संबंधित कंपनीची असून, त्यांनी सोयीनुसार तीन ठिकाणांची निवड केली आहे. राज्यात वर्षाला ४० ते ५० लाख स्मार्ट कार्डची गरज भासते. ही कंपनी २१ ऑगस्टपासून स्मार्ट कार्डची छपाई करणार असून, संबंधितांना आधीप्रमाणाचे स्पीड पोस्टाने ती मिळणार आहेत. -विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वीप्रमाणे प्रत्येक प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्मार्ट कार्ड छपाईची व्यवस्था सुरू ठेवावी. स्मार्ट कार्डमध्ये एखादी दुरुस्ती करावयाची झाल्यास पुण्यातील नागरिकांनी कुठे शोधाशोध करायची? राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या पुणे आरटीओला यात डावलू नये. -राजू घाटोळे, अध्यक्ष, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य