पुणे : नदीपात्रात अडकलेल्या महाविद्यालयीन युवकाला अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. सोमवारी सकाळी डीपी रस्त्यावरील पंडित फार्मजवळ ही घटना घडली.
या घटनेत बचावलेल्या युवकाचे वय २० वर्ष आहे. डीपी रस्त्यावरील पंडीत फार्मजवळ असलेल्या मुठा नदीपात्रात एक तरुण अडकला असून, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाच्या एरंडवणे केंद्राला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख राजेश जगताप आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याला वेग आहे. पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याची शक्यता असल्याने युवक नदीपात्रातील एक कठड्याला धरून थांबला होता. जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. दोरीचा वापर करुन नदीपात्रात अडकलेल्या युवकाची सुटका करण्यात आली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
या घटनेत बचावलेला युवक मूळचा अहिल्यानगरचा आहे. तो पुण्यात शिक्षणासाठी आला आहे. त्याचे मामा एरंडवणे भागात राहायला आहेत. सध्या तो मामाकडे राहायला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. या घटनेची माहिती युवकाच्या मामाला कळविण्यात आली. युवकाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी युवकाच्या माामाची चौकशी केली. तेव्हा गेल्या काही दिवसांपासून युवक मानसिक विकाराने ग्रस्त होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते, असे मामाने पोलिसांना सांगितले, असे अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी सांगितले.
पंडीत फार्म परिसरातील रहिवाशांनी या घटनेची माहिती त्वरीत अग्निशमन दल आणि पोलिसांना दिल्याने युवकाला तातडीने मदत उपलब्ध झाली. वेळेत मदत उपलब्ध झाली नसती, तर युवक प्रवाहात वाहून गेला असता, असे पोलीस निरीक्षक रोकडे यांनी सांगितले.