पुणे : चाकण येथील महापारेषणच्या ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र (पॉवर ट्रान्सफॉर्मर) नादुरुस्त झाल्याने सुमारे १० ते १५ मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. त्यासाठी महावितरणकडून भारव्यवस्थापनाचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. मात्र विजेची मागणी अधिक असल्याने गरज भासल्यास चाकण एमआयडीसीमधील काही वीजवाहिन्यांवर तात्पुरते भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे.

महापारेषणच्या चाकण येथील ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये प्रत्येकी ५० एमव्हीए क्षमतेचे तीन रोहित्र आहेत. त्यातून चाकण एमआयडीसीला ११० मेगावॅट विजेचा पुरवठा केला जातो. तीनपैकी एका रोहित्रामध्ये गुरुवारी (१ जून) मध्यरात्रीनंतर बिघाड झाला. त्याची तपासणी केला असता तो पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आले. त्यानंतर महापारेषणकडून नवीन रोहित्र बसविण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र या कामासाठी मंगळवारपर्यंत (६ जून) कालावधी लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> पुणे : शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रकार समुपदेशनात उघड

महापारेषणच्या या उपकेंद्रातील उर्वरित राेहित्रांवर वीजभार टाकण्यात आला आहे. सध्या विजेची मागणी वाढली आहे. उर्वरित १० ते १५ मेगावॅट विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गरज भासल्यास नानेकरवाडी, कुरुळी, एमआयडीसी, सारा सिटी, फोर्स मोटर्स, चिंबळी, आळंदी फाटा आणि खालुंब्रे या २२ केव्ही वीजवाहिन्यांवर दिवसा चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४६ हजार ग्राहकांची वीज खंडित

चाकण शहर आणि परिसरात गुरुवारी (१ जून) सायंकाळी वादळासह झालेल्या मुसळधार पूर्वमोसमी पावसामध्ये विविध ठिकाणी लावलेले कापडी फलक, होर्डिंग्ज महावितरणच्या अनेक वीजवाहिन्यांवर पडल्याने चाकण शहर आणि एमआयडीसी परिसरातील सुमारे ४६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे यातील ९० टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा फलकांमुळे तर उर्वरित १० टक्के वीजपुरवठा मोठी झाडे आणि फांद्या यंत्रणेवर पडल्यामुळे खंडित झाल्याचे निदर्शनास आले. महावितरणकडून वीजतारांची दुरुस्ती करून शुक्रवारी (२ जून) पहाटे तीन वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.