पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतराराष्ट्रीय विमानतळासाठी साडेसात हजार एकराऐवजी केवळ तीन हजार एक क्षेत्र संपादित केले जाणार असल्याने लाॅजिस्टिक पार्कच्या क्षेत्रातही कमी होणार आहे. लाॅजिस्टिक पार्क तीनशे ते चारशे एकर क्षेत्रामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरंदर विमानतळासाठी सात गावातील क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली असून ५६ टक्के शेतकऱ्यांनी जागा देण्याबाबतची संमतिपत्रे जिल्हा प्रशासनाकडे दिली असून येत्या १८ सप्टेंबर पर्यंत संमतिपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत.

पुरंदर विमानतळासाठी एकूण साडेसात हजार एकर जागेचे संपादन करण्यात येणार होते. मात्र भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पासून पुरंदर तालुक्यातील सात गावांतून विरोध होण्यास सुरुवात झाल्याने प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एकूण जागेपैकी निम्मी जागा पहिल्या टप्प्यात संपादित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार तीन हजार एकरचे क्षेत्र आता संपादित केले जाणार आहे. विमानतळाचे क्षेत्र कमी झाल्याने विमानतळ प्रकल्प २ हजार २०० एकर क्षेत्रात उभारला जाणार आहे. त्यामुळे लाॅजिस्टिक पार्कचे क्षेत्रही कमी झाले आहे.

यापूर्वीच्या प्रस्तावित संपादनाच्या क्षेत्रानुसार, लाॅजिस्टिक पार्कसाठी मोठ्या प्रमाणावर जागा घेण्याचे नियोजित होते. मात्र विमानतळाच्या जागेचे क्षेत्र कमी झाल्याने आता सुमारे ३०० ते ४०० एकर क्षेत्रात पार्क उभारणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.विमानतळासाठी संमतिपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदल्याचा दर निश्चित झाल्यानंतर जमिनींसह घर, झाडे, बागा, विहिरी यांच्यासाठीच्या मोबदल्याची रक्कमही निश्चित केली जाणार आहे. त्यानुसार मोबदल्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. ही रक्कम हप्त्यांमध्ये न देता एक रकमी दिली जाणार आहे.

दरम्यान, विमानतळासाठी शेतकऱ्यांनी जागा देऊ नये, यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे प्रकार केले जात आहेत. मात्र दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती या शेतकरी नसून स्थानिक दलाल असल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या गोपनीय माहितीमध्ये ही बाब नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे दलालांच्या दिशाभूल करण्याच्या प्रकाराला बळी पडू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.