|| राहुल खळदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्वती गावात राहणाऱ्या संदीप सखाराम दगडे याचे टोपणनाव बंडू आहे.  दगडेने पुणे शहरालगत जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले होते. पंचवीस वर्षांपूर्वी पुण्याचा विस्तार फारसा नव्हता. भविष्यात पुण्याचा विस्तार चहूबाजूने होणार असल्याची जाणीव बांधकाम क्षेत्रातील अनेक बडय़ा बांधकाम व्यावसायिकांना होती. त्यामुळे बावधन, कोथरूड, सिंहगड रस्ता, धनकवडी, वडगाव शेरी भागातील शेतजमिनी खरेदी करण्यास सुरुवात झाली होती. तेथील स्थानिक शेतकरी तसेच ग्रामस्थांना हाताशी धरून जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार पार पाडू जाऊ लागले. त्यासाठी मध्यस्थांची म्हणजेच दलालांची मोठी गरज निर्माण झाली होती.  सदाशिव पेठेतील शेडगे आळीत अशोक अब्दागिरे याने जमीनखरेदी विक्री व्यवहारात त्या वेळी जम बसविला होता. अब्दागिरे याच्या माध्यमातून बावधन भागातील अनेक जमिनी खरेदी करण्यात आल्या होत्या. अब्दागिरेंच्या संपर्कात तेव्हा बंडू दगडे होता. जमीन व्यवहारातील अडथळे दूर करण्याचे काम दगडे साथीदारांमार्फत करत होता. दगडेचा विश्वासू साथीदार दत्त्तवाडी भागातील महेश मेंगडे होता.

दरम्यान, एका जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात दगडेचा अब्दागिरेंशी वाद झाला. हा वाद आर्थिक स्वरुपाचा होता. त्यानंतर अब्दागिरेंचा खून करण्याचा कट दगडेने रचला. पौडनजीक असलेल्या घाटात  ४ मे २००० रोजी अब्दागिरेंचा खून दगडे आणि मेंगडेने केला. त्यानंतर दगडे पसार झाला. त्याचा साथीदार मेंगडेला अटक करण्यात आली. पोलिस मागावर असल्याची जाणीव झाल्यानंतर दगडे पुण्यातून पसार झाला. त्या वेळी त्याची पत्नी आणि मुलगा पुण्यात राहत होते.

पुण्यातून पसार झालेला दगडे काही काळ मुंबईत होता. तेथे एका नातेवाइकाच्या मदतीने त्याने दोन डान्सबार भाडेतत्त्वावर चालवायला घेतले होते. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी दगडे मुंबईतील गुंड टोळ्यांच्या संपर्कात आला होता. त्याचा पुण्यातील साथीदार मेंगडे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सांभाळत होता. मेंगडेने जमीन खरेदी विक्रीतून मिळालेले पैसे दगडेला देण्यास टाळाटाळ सुरु केली. मिळालेल्या रकमेतील अतिशय कमी रक्कम तो दगडेला  देत होता. त्यामुळे दगडेने मेंगडेचा खून करण्याचा कट रचला. पुण्यातील साथीदारांच्या मदतीने पौड येथे मेंगडेवर ८ फेब्रुवारी २००६ रोजी गोळ्या झाडून त्याचा खून केला. मेंगडे खूनप्रकरणात दगडेचे नाव पुढे आले. त्याला शोधण्यासाठी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तपास सुरु केला. पोलीस मागावर असल्याची जाणीव झाल्यानंतर दगडे परदेशात पळाला. कुख्यात गुंड छोटा राजनच्या संपर्कात तो आला. मेंगडेच्या खुनाचा सूड उगविण्यासाठी दगडेचा भाऊ  सुनील दगडे यांचा एरंडवणे भागात ८ फेब्रुवारी २००८ खून करण्यात आला होता.

गेले अठ्ठावीस वर्ष दगडे पसार आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले. दगडेचा शोध घेण्यासाठी मुंबईत पोलिसांची पथके पाठविण्यात आली होती, मात्र दगडेचा ठावठिकाणा लागलेला नाही. दगडे सध्या  नेपाळमध्ये आहे. छोटा राजनचे व्यवहार दगडे सांभाळत आहे. मध्यंतरी दगडे पुण्यात वेशांतर करुन फिरत असल्याची माहिती होती. पण दोन खून करणाऱ्या दगडेला पकडण्यासाठी पोलिसांकडून व्यापक प्रयत्न करण्यात आले नाहीत किंवा पोलिसांचे प्रयत्न अपुरे पडले, अशी खंत एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली.

दगडेच्या मुलाचे शिक्षण पुण्यात झाले. मध्यभागातील एका महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता. सध्या त्याचा कुटुंबाचा वावर पुण्यात नाही. गेली अठ्ठावीस वर्ष दगडे पसार आहे. त्याचा शोध लागलेला नाही.  दगडेने दोन्ही खून ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत केले आहेत. ग्रामीण पोलिसांनी आता दगडेचा माग काढणे थांबविले आहे.

rahul.khaladkar@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta crime story
First published on: 21-06-2018 at 01:03 IST