भर रस्त्यात तलवारीने केक कापून, कोयते उगारून वाढदिवस साजरा करणे, सामान्यांच्या वाहनांची तोडफोड, रस्त्यावरील किरकोळ वादातून बेदम मारहाण, तसेच पोलिसांशी अरेरावी करण्याचे प्रकार पुण्यात वाढीस लागले आहेत. चार दिवसांपूर्वी ‘मकोका’ कारवाई केलेल्या एका गुंडाने तळजाई वसाहतीतील तर सहकारनगर पोलीस ठाण्यात गोंधळ घालून तोडफोड केली. बेडी घातलेला हात काचेवर आपटला, जखमी अवस्थेतील गुंडाने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सामान्यांचा आधार असलेल्या पोलीस ठाण्यातच एका गुंडाने धुमाकूळ घालण्याचा प्रकार धक्कादायक असून, अशा प्रकारची दहशत आणि गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी आता पोलिसांनी कठोर कारवाई करायला हवी.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढत आहे. किरकोळ वादातून मारहाण करणे, फेरीवाले, विक्रेत्यांना धमकावून खंडणी मागणे, तसेच नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना सातत्याने घडतात. अशा प्रकारच्या घटना कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लावतात. शिवाय, शहराच्या नावलौकिकाला काळिमा फासतात. सुसंस्कृत पुण्यातील वाढती गुन्हेगारी ही निश्चितच चांगली बाब नाही. गुंडांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात फरक पडत नसल्याचे दिसून आले आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्यात गोधळ घालणारा गुंड ऋषिकेश उर्फ बारक्या लोंढे याचे वर्तनही अशाच प्रकारचे. २०२३ मध्ये तळजाई वसाहतीत लोंढे आणि साथीदारांनी ४० ते ४५ वाहनांची तोडफोड केली होती. तळजाई वसाहतीत कष्टकरी राहायला आहेत. पै-पै करून साठविलेल्या पैशांमधून खरेदी केलेली दुचाकी, टेम्पो, रिक्षांची तोडफोड करणाऱ्या लोंढेसह साथीदारांविरुद्ध नागरिकांनी कडक कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी लोंढे आणि साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. या कारवाईमुळे लोंढे आणि साथीदारांच्या दहशतीला चाप बसला. ‘मकोका’ कारवाईत न्यायालयाकडून जामीन मिळवून लोंढे काही महिन्यांपूर्वी कारागृहातून बाहेर पडला आणि त्याने पुन्हा दहशत माजविण्यास सुरुवात केली.
सहकारनगर पोलीस ठाण्यात तोडफोड करण्यापूर्वी १७ जुलै रोजी ब्युटीपार्लरमधून घरी निघालेल्या एका युवतीला अडवून लोंढेने तिचा विनयभंग केला. या घटनेची माहिती युवतीने तिच्या काकाला दिली. त्यानंतर लोंढेने काकाला जिवे मारण्याची धमकी दिली. या गुन्ह्यात पकडण्यासाठी पोलिसांचे पथक लोंढेच्या घरी पोहोचले. तेव्हा त्याने पोलिसांवर पेपर स्प्रे मारला. डोळे चुरचुरल्यानंतर त्याने पोलिसांच्या ताब्यातून पसार होण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री त्याला ताब्यात घेऊन पोलिसांचे पथक पोलीस ठाण्यात पोहोचले. तेव्हा त्याने पोलीस ठाण्यात गोंधळ घालून तोडफोड केली. एवढेच नव्हे, तर महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेला. पोलिसांनी लोंढे आणि त्याचा भाऊ मोन्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले. तेव्हा त्याचा भाऊ मोन्या पोलिसांची नजर चुकवून रुग्णलायातून पसार झाला. एका गुंडाने पोलिसांना कशा प्रकारे जेरीस आणले, यासाठी हा सारा घटनाक्रम. न्यायालयातही लोंढेने पोलिसांशी अरेरावी, शिवीगाळ केली.
अशा प्रकारच्या घटना शहरात नेहमीच घडतात. मात्र, अशा प्रकरणांना वेगळाच रंग देऊन पोलिसांवर दबाव टाकण्याचेही प्रयत्न होतात. अशा प्रकारांमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होतो. गुंडाविरुद्ध केली जाणारी कारवाई बाजूला राहते आणि दबाब, अरेरावी, आरोपांमुळे पोलीसच जेरीस येतात. अशा परिस्थितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पाठबळ महत्त्वाचे ठरते. आरोप-प्रत्यारोपामुळे पोलीस दलातून निलंबित होण्याची टांगती तलवार असते. पोलिसी खाक्या दाखविण्यापेक्षा कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करणे श्रेयस्कर ठरते. जामीन मिळवून कारागृहातून बाहेर पडलेल्या सराइतांचा उच्छाद पुन्हा सुरू होतो. त्यांच्या दहशतीमुळे नागरिक पोलिसांकडे तक्रारही करू शकत नाही. अशा परिस्थितीत आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुंडगिरी ठेचण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात. गुंडगिरी ठेचून शहरात कायद्याचे राज्य आहे, असा कठोर संदेश देणे आता गरजेचे झाले आहे.
rahul.khaladkar@expressindia.com