पिंपरी-चिंचवड : लोणावळ्यात बाहेरचे आणि स्थानिक कॅब चालक यांच्यात वाद पेटला आहे. बाहेरच्या कॅब चालकांना बेदम मारहाण करण्यात येत असून, त्यांच्या कॅबची तोडफोड करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सोन्या गुप्ता नावाच्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे, जो व्हिडिओमध्ये कॅबची तोडफोड आणि कॅब चालकाला मारहाण करताना दिसत आहे.
“दादा, मी नाष्टा करायला गेलो होतो. गाडी फोडू नका ना,” अशी गहिवरून कॅब चालकाने सोन्या गुप्ताला विनंती केली. तरीही सोन्या गुप्ता ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याने कॅबची मागील आणि पुढील काच दगडाने फोडली, तसेच त्याला धक्काबुक्की करत मारहाण केली आहे. ही घटना लोणावळ्यात शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास घडली आहे. हा व्हिडिओ सोन्या गुप्ताच्या मित्रांनी मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोन्या गुप्ताला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे, असे लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले आहे. याआधी देखील अशाच प्रकारे बाहेरच्या कॅब चालकांना मारहाण करून धमकावण्यात आले आहे, अशी माहिती कॅब चालकांनी दिली आहे. या अशा व्यक्तींना स्थानिक नेत्यांचा आणि आमदारांचा वरदहस्त असल्याचं बोललं जात आहे. अशी गुंडगिरी करणे कितपत योग्य आहे? अशा व्यक्तींना पाठीशी घालणे देखील नक्कीच गुन्हा आहे, असे बोलले जात आहे. घटनेचा अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
