पंधरा वर्षांहून अधिक काळाच्या मागणीला मागील पाच वर्षांपासून मिळालेली मंजुरी व मागील वर्षी मंजूर झालेला निधी, अशा पाश्र्वभूमीवर पुणे ते दौंड या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम सध्या जोमाने सुरू आहे. सत्तर टक्क्य़ांहून अधिक काम पूर्ण झाले असून, पुढील चार ते पाच महिन्यांमध्ये विद्युतीकरण पूर्ण होणार आहे. त्यामुळे नव्या वर्षांमध्ये लोणावळा-पुणे ही लोकलसेवेचा विस्तार होऊन पुणेमार्गे लोणावळा ते दौंड अशी थेट लोकलसेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. लोकलच्या या सेवेमुळे पुणे व िपपरी-चिंचवड या दोन शहरांसह मावळ व दौंड हे दोन तालुकेही जोडले जाणार आहेत. त्यामुळे नोकरदार व विद्यार्थ्यांसह शेतकरी वर्गालाही त्याचा मोठा फायदा हणार आहे.
पुणे-दौंड मार्गावर इंधनावर गाडय़ा चालविल्या जातात. प्रवाशांची मागणी लक्षात घेता सुमारे पाच वर्षांपूर्वीच पुणे-दौंड मार्गाच्या विद्युतीकरणास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्येही विद्युतीकरणाची रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर या कामाच्या निविदा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या, मात्र अनेक दिवस विद्युतीकरणाचे काम रेंगाळले होते. प्रवासी संघटनांच्या वतीने या मार्गाच्या विद्युतीकरणाबाबत वेळोवेळी मागणी करण्यात येत होती.
पुणे-दौंड मार्गावर सध्या प्रवाशांची संख्या वाढते आहे. रेल्वे मार्गालगतच्या भागातून पुण्यामध्ये शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, तसेच कामगार व व्यावसायिकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. पुणे-सोलापूर मार्गावरील प्रवासाऐवजी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य दिले जाते. अशा परिस्थितीत या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेच्या पॅसेंजर व एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येते. गाडय़ांमध्ये अक्षरश: पाय ठेवायलाही जागा मिळत नाही.
मागील वर्षी पुणे-दौंड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम सुरू झाले. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर अनेक समस्या सुटू शकणार आहेत. लोकलसेवा सुरू करण्याबरोबरच विद्युतीकरणाने गाडय़ांचा वेग वाढल्यानंतर वाचलेल्या वेळामध्ये नवी गाडी सुरू करता येईल. पुणे-लोणावळा या मार्गावरील लोकलसेवेला चांगली मागणी आहे. मावळ किंवा िपपरी-चिंचवड विभागातून दौंड पट्टय़ात जाण्यासाठी दोन गाडय़ा बदलाव्या लागतात. दौंडच्या पट्टय़ातून मावळ भागात जाणाऱ्या प्रवाशांनाही तेच करावे लागते. लोणावळा-दौंड अशी थेट लोकल झाल्यास प्रवाशांचा वेळ व पैसाही वाचू शकणार आहे. विकासाच्या दृष्टीनेही लोकलचा हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे.

‘‘पुणे-दौंड मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम मार्च २०१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर पुढील तीन महिने तपासणी करून प्रत्यक्ष गाडय़ा चालवून पाहिल्या जातील. काही त्रुटी असल्यास त्या दूर केल्यानंतर या मार्गावर विजेवर चालणाऱ्या गाडय़ा सुरू होतील. त्यामुळे लोणावळा ते दौंड ही लोकलही सुरू करता येईल. या लोकलमुळे मोठा भाग पुण्याशी जोडला जाणार आहे. अनेक प्रवाशांसाठी ही सेवा उपयुक्त ठरेल.’’

– वाय. के. सिंह
जनसंपर्क अधिकारी, रेल्वे पुणे विभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.