पिंपरी : पर्यटननगरी लोणावळा नगरपरिषदेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेऊन स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपने माजी आमदार बाळा भेगडे यांची प्रभारी पदी नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची सूत्रे आमदार सुनील शेळके यांच्याकडे आहेत. त्यामुळे लोणावळ्यात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
लोणावळ्यात २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक आठ नगरसेवक निवडून आले होते. भाजपच्या सुरेखा जाधव या नगराध्यक्षा म्हणून जनतेतून निवडून आल्या होत्या. तत्कालीन शिवसेना व काँग्रेस प्रत्येकी सहा, अपक्ष चार, भारतीय रिपब्लिकन पक्षाने (आरपीआय) एका जागेवर विजय मिळवला होता. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. यंदा नगराध्यक्षपद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. शहरामध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा पक्ष असून, त्या खालोखाल काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) हा पक्ष आहे. २०१६ च्या निवडणुकीमध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती.
आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा आमदार आहे. विधानसभा निवडणुकीत शेळके यांना लोणावळ्यातून मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. आमदार शेळके यांच्यामुळे अनेक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्यास तयार असले, तरी प्रत्येक पक्ष मागील निवडणुकीमध्ये जिंकलेल्या जागांवर दावा करत आहे. त्यामुळे आमदारांची कोंडी झाली आहे. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किरण गायकवाड यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. काँग्रेसची ताकद आहे; पण सक्षम नेतृत्व नाही, अशी परिस्थिती आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचीही लोणावळा शहरात ताकद आहे. या पक्षाच्या नेत्या शादान चौधरी यांचे काही प्रभागावर वर्चस्व आहे.
सत्ता राखण्याचे भाजपपुढे आव्हान
लोणावळ्यात भाजपची ताकद असून पक्षाच्या नेत्या, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अमित गवळी, माजी नगरसेवक गिरीश कांबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित करण्याचे आव्हान भाजपपुढे असणार आहे. आमदार शेळके यांनीही लोणावळ्यात ताकद लावली आहे. त्यामुळे सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसते.
१३ प्रभाग, २७ नगरसेवक
लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत १३ प्रभाग असून, २७ नगरसेवक आहेत. १२ प्रभागांतून दोन आणि एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. मतदारसंख्या ४८ हजार ३७३ असून ६३ मतदार केंद्र असणार आहेत.
