मार्केटयार्डमधील सुकामेव्याच्या व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून व कोयत्याचा धाख दाखवून सव्वा लाख रुपयांची लूट केल्याची घटना शनिवारी रात्री घोरपडे पेठेतील एकबोटे कॉलनीत घडली. व्यापाऱ्याची दुचाकी व मोबाईलही चोरटय़ांनी पळवून नेला.
राजीव भीमराव बांठीया (वय ३५, रा. कृष्णकुंज सोसायटी, पूलगेट, लष्कर) या व्यापाऱ्याने याबाबत खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांठीया हे मार्केटयार्डात सुकामेव्याचा व्यापार करतात. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले व दिवसभरात जमा झालेली सव्वा लाख रुपयांची रोकड घेऊन ते दुचाकीवरून निघाले. त्यांच्यासोबत त्यांच्या दुकानातील एक महिला कामगारही होती. या महिलेला एकबोटे कॉलनीत सोडायचे असल्याने ते त्या ठिकाणी गेले.
बांठीया यांनी रोख रक्कम दुचाकीच्या डिकीत ठेवली होती. रात्री पावणे अकराच्या सुमारास ते एकबोटे कॉलनीत पोहोचले. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. ‘दुचाकीला कट का मारला’, अशी विचारणा करीत त्यांनी उगाचच भांडण काढले. त्यानंतर या चोरटय़ांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवला. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असलेल्या महिलेलाही धमकावले. बांठीया यांच्याकडून दुचाकीची चावी घेतली. डिकीतील रोकड असलेली बॅग चोरटय़ांनी काढून घेतली. मोबाईलही काढून घेतला व दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले.