पुणे : ‘जंगलात जाण्याचा कुठलाच ठावठिकाणा किंवा मार्ग नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील प्रचारकांनी पाच ते सहा दशकांपूर्वी खस्ता खात, हाल अपेष्टा सहन करून पायवाट निर्माण केली. त्याची मळवाट, त्यानंतर रस्ते आणि महामार्गांमध्ये रूपांतर झाले असून, ते महामार्ग ईशान्य भारताच्या दिशेने जातात. त्याचे श्रेय शशिकांत चौथाईवाले यांच्या पिढीतील प्रचारकांना जाते,’ असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी काढले.

‘माय होम इंडिया’ आणि ‘भारतीय विचारसाधना’ यांच्यातर्फे शशिकांत चौथाईवाले लिखित ‘माझी प्रचारक यात्रा’ या मराठी आणि इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन मंगळवारी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारक सुमंत आमशेकर, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी’चे संयोजक विजय चौथाईवाले, ‘भारतीय विचार साधना’चे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे यावेळी उपस्थित होते.

चौथाईवाले यांनी वयाची ८८ वर्षे पूर्ण केल्याबद्दल सुवासिनींनी त्यांना ओवाळले. तसेच, मान्यवरांच्या हस्ते पगडी, शाल, मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

जोशी म्हणाले, ‘पूर्वांचल म्हणजे आत्ताच्या ईशान्य भारतात सहा दशकांपूर्वी आदिवासी आणि बिगर आदिवासी अशी दरी दूर करण्यासाठी केवळ संघाची शाखा खुली करून उपयोग नव्हता, तर रामकृष्ण मिशन, विवेकानंद केंद्र आदींच्या माध्यमातून ईशान्य भारत आणि उर्वरित भारतामधील अंतर कमी करण्यात प्रचारकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. ६० वर्षांपासून आपले काही नाही, हा भाव मनात ठेवून त्यांनी प्रचारकपदी झोकून घेतले. ते निवृत्त झाले, असे बोलले जात असले, तरी संघात सेवानिवृत्ती नसते. निवृत्ती ही दायित्वमुक्ती आहे. प्रचारकाचे जीवन संघात आल्यानंतर समजते. चौथाईवाले यांचे गोत्रच प्रचारक आहे.’

‘आज ईशान्य भारतात संघ विचाराचे सरकार आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खडतर आयुष्य भोगून रोपट्याचा वटवृक्ष तयार केला आहे,’ असे देवधर यांनी सांगताना चौथाईवाले यांच्या गृहस्थाश्रमापासून आत्तापर्यंतचा पट उलघडला.

‘तर तुम्ही डॉ. हेडगेवारांच्या संघातले…’

‘पूर्वांचलात काम करण्यासाठी महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात अशा विविध राज्यांमधून आम्ही आसाममध्ये जेव्हा प्रथम पोहोचलो. तेव्हा तेथे संघाचे काहीही काम नव्हते. त्यामुळे संघाच्या कामाचा श्रीगणेशा आणि सर्व काही तुम्हालाच करायचे आहे, असे आमचे प्रांतचालक मधुकरराव लिमये यांना सांगायचे होते. ‘तुम्ही आसाममध्ये आहात, त्यामुळे बाळासाहेब देवरस यांच्या संघात नसून, तुम्ही डॉ. हेडगेवार यांच्या संघात आहात, असे समजून काम करा,’ असा सल्ला दिल्याची आठवण चौथाईवाले यांनी या वेळी करून दिली.