लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राज्यातील सत्ता बदलानंतर शहरांची नावे बदलण्याचे लोण पुण्यातील उपनगरापर्यंत पोहोचले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील महंमदवाडी या उपनगराचे नाव महादेववाडी करण्याच्या हालचाली शिवसेना गटाकडून सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे ( शिंदे गट) विधीमंडळातील मुख्य प्रतोद व रायगडचे आमदार भरत गोगावले यांनी अशी स्पष्ट मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनी आमदार गोगावले यांच्याकडे ही मागणी केली होती. त्यानुसार गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात महापालिकेकडे अभिप्राय मागवण्यात आला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना उस्मानाबादचे नामकरण धाराशिव आणि औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर असे करण्याचा ठराव मंत्रीमंडळाने मंजूर केला होता. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका उपनगराचे नाव बदलण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू झाल्या आहेत.
आणखी वाचा-पुणे: मोदी पुन्हा सत्तेवर आले तर भारत जगातील तिसरी महासत्ता
हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राज्यातील बदलत्या सत्तासमीकरणात या विधानसभा मतदारसंघातील महंमदवाडी या उपनगाराचे नाव महादेववाडी करावे अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी सातत्याने केली होती. त्यानुसार त्यांनी आमदार आणि विधीमंडळाचे पतोद भरत गोगावले यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार त्यांनी महंमदवाडीचे नाव महादेववाडी करावे असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयानेही दखल घेतली असून यासंदर्भात महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी तातडीने अभिप्राय वजा अहवाल द्यावा अशी सूचना केली आहे.
आणखी वाचा-पुणे: लष्कर भागात बँक फोडणारा सुरक्षारक्षक गजाआड
दरम्यान हडपसर परिसरातील हंडेवाडी येथे प्रभू श्रीराम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावाला राज्याच्या नगरविकास विभागानेही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. हा प्रस्तावही शिवसेनेचे तत्कालिन नगरसेवक विद्यमान शहरप्रमुख नाना भानगिरे यांनीच महापालिका प्रशासनास दिला होता.