पुणे : महामेट्रो आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो मार्गिकांच्या कामांमुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे महापालिकेने बुजविले. मात्र त्यासाठी महापालिकेने केलेला खर्च देण्यास महामेट्रो आणि पीएमआरडीएकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यासंदर्भात महापालिकेने या दोन्ही यंत्रणांना सातत्याने स्मरणपत्रे पाठविले असून त्यानंतरही खर्च देण्यात आलेला नाही.

हेही वाचा >>>लवकरच विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकची परीक्षा मराठी भाषेतून देता येणार; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरात सध्या काही भागात मेट्रो मार्गिकांची आणि मेट्रो स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. मेट्रोच्या कामामुळे काही रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे हे रस्ते महामेट्रोनेच दुरुस्त करावेत, असा निर्णय यापूर्वी झाला आहे. मात्र मेट्रोकडून रस्तेदुरुस्ती केली जात नसल्याची तक्रार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महापालिका आणि महामेट्रोने वाद न घातला तातडीने रस्ते दुरुस्त करावेत, अशी सूचना केली होती.

हेही वाचा >>> विद्यापीठ शुल्कवाढ विरोधातील आंदोलन स्थगित

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी महापालिकेच्या पथ विभागाचे अधिकारी आणि महामेट्रोचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. त्या वेळी मेट्रोच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची जबाबदारी महामेट्रोचीच असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले होते. त्या वेळी महामेट्रो आणि पीएमआरडीएकडून त्याला मान्यात देण्यात आली होती. मात्र आता खर्च देण्यास या दोन्ही यंत्रणांकडून टाळाटाळ केली जात आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार होते. त्या वेळी मेट्रोकडून रस्त्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. मात्र हे काम महापालिकेकडून करण्यात आले होेते. तसेच विधी महाविद्यालय, सेनापती बापट रस्ता या मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्तीही महापालिकेकडून करण्यात आली होती. त्यासंदर्भात १ कोटी ५६ लाखांचे देयक मेट्रोला सादर करण्यात आले आहे. याशिवाय अन्य रस्ते दुरुस्तीचा खर्च आणि पीएमआरडीएच्या हद्दीतील रस्ते दुरुस्तीच्या खर्चाची देयकेही पाठविण्यात आली आहेत. अधिकृत खोदकाम केल्याप्रकरणीही या दोन्ही संस्थांना महापालिकेने दंड ठोठावला आहे. मात्र तो देण्यात आलेला नाही.