पुणे मेट्रोच्या वनाझ ते रुबी हॉल मार्गावरील सेवेला सोमवारी (ता. १४) ब्रेक लागला होता. वीजपुरवठा खंडित झाल्याने सेवा २० मिनिटे ठप्प झाली होती. याप्रकरणी महामेट्रोने महापारेषणकडे बोट दाखविले होते. आता महापारेषणने महामेट्रोच्या तांत्रिक चुकीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मेट्रोची बत्ती नेमकी कोणामुळे गुल झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> मंत्री हसन मुश्रीफ थेट ससून रुग्णालयात येतात तेव्हा…

मेट्रोच्या वनाझ ते रुबी हॉल मार्गावरील वीजपुरवठा १४ ऑगस्टला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खंडित झाला होता. त्यामुळे या मार्गावरील सेवा बंद झाली. सर्व मेट्रो गाड्या स्थानकावर २० मिनिटे उभ्या होत्या. या मार्गावरील वीजपुरवठा सुरळीत करण्यास सुमारे २० मिनिटांचा कालावधी लागला. त्यानंतर या मार्गावरील सेवा पूर्ववत झाली होती. याप्रकरणी महामेट्रोने महापारेषणकडे बोट दाखविले होते. मात्र यावर खुलासा करीत हा सर्व प्रकार मेट्रोचीच चूक असल्याचे महापारेषणने म्हटले आहे. महामेट्रोचे वीज उपकेंद्र रेंजहिल्स येथे आहे. तेथील ट्रान्सफॉर्मरची देखभाल व दुरुस्ती सुरू होती. हे काम त्रयस्थ संस्थेला देण्यात आले आहे. या संस्थेच्या तंत्रज्ञाकडून चूक झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मेट्रो सेवा ठप्प झाली. नंतर त्यांनीच हा वीजपुरवठा सुरळीत केल्याने मेट्रोसेवा पूर्ववत सुरू झाली, असे महापारेषणने म्हटले आहे. या निमित्ताने दोन सरकारी यंत्रणांमधील विसंवाद समोर आला आहे. त्याचबरोबर नेमकी चूक कोणाची, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.