पुणे : शिक्षण विभागाने राज्यातील शाळा, शिक्षकांवर अप्रत्यक्षपणे यू ट्युब वाहिनी सुरू करण्याची सक्ती केल्याचे दिसून येत आहे. स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदनासह होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कवायतीची ध्वनिचित्रफीत तयार करून ती यू ट्युब वाहिनीवर टाकून त्याचा दुवा, कार्यक्रमाची छायाचित्रे अर्जात जोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे शाळा, शिक्षकांवर स्वातंत्र्यदिनीच अतिरिक्त कामाची सक्ती करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
स्वातंत्र्यदिनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या कवायतींचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी २३ जुलै रोजी परिपत्रकाद्वारे दिल्या होत्या. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळींवर आधारित कवायत असा किमान २० मिनिटे कालावधीचा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी आयोजित करावा, कवायतीमध्ये वेगवेगळ्या वयोगटांतील आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असावा, या संदर्भातील कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर, आता शाळांकडून स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल संकलित करण्यासाठी शिक्षण विभागाने गुगल अर्जाचा दुवा तयार केला आहे. या अर्जातील माहिती प्रत्येक शाळेला मराठीतून स्वतंत्रपणे माहिती भरावी लागणार आहे. तसेच, शिक्षकांनी कवायत, संचलनाची चार-पाच उच्च दर्जाची छायाचित्रे काढून ती त्या अर्जात जोडायची आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी कवायत, संचलन करत असताना शिक्षकांनी चित्रीकरण करून त्याची चित्रफीत शाळेच्या वा शिक्षकांच्या यू ट्युब वाहिनीवर अपलोड करून त्याचा दुवा अर्जात द्यावा, असे गुगल अर्जातील सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
‘स्वातंत्र्यदिनी कवायती, देशभक्तिपर वातावरण निर्मिती करण्याचा उपक्रम चांगला आहे. मात्र, त्याची छायाचित्रे, चित्रफिती तयार करून अपलोड करणे शिक्षक, शाळांसाठी अडचणीचे आहे. सर्वच शाळा वा शिक्षकांची यू ट्युबवर वाहिनी नाही, त्याशिवाय ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्कच्या अडचणी आहेत. त्यामुळे छायाचित्रे, चित्रफिती अपलोड कधी करायच्या याबाबतही स्पष्टता नाही,’ असे एका शिक्षकाने सांगितले.
विविध उपक्रमांची छायाचित्रे, चित्रफिती पाठवण्याचा आदेश, परिपत्रके शिक्षण विभागाकडून नेहमीच दिली जातात. आता यू ट्युबवर वाहिनी सुरू करून त्याचा दुवा देण्यास सांगण्यात आले आहे. अशा प्रकारे संकलित केलेल्या माहितीचे पुढे काय होते हे समजत नाही. सर्वच शाळा, सर्वच शिक्षकांची यू ट्युब वाहिनी आहे किंवा त्यांना सुरू करण्याची इच्छा आहे, असेही नाही. मात्र, या उपक्रमाच्या माहिती संकलनाच्या नावाखाली शिक्षकांना त्यासाठी भाग पाडले जात आहे. – महेंद्र गणपुले, माजी मुख्याध्यापक