पुणे : राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत राबवण्यात आलेल्या अखेरच्या फेरीनंतरही काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी आणखी एक विशेष फेरी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ३ ते ६ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज भरणे, पसंतीक्रम नोंदवता येणार असून, ८ सप्टेंबर रोजी निवडयादी जाहीर करण्यात येणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी ही माहिती दिली. सर्वांसाठी खुला प्रवेश अंतर्गत राबवण्यात आलेली विशेष फेरी ही शेवटची फेरी म्हणून घोषित करण्यात आली होती. या फेरीत ३८ हजार ८५३ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला होता. प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना मंगळवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यापैकी ३७ हजार ७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. त्यापैकी ३४ हजार २९५ विद्यार्थ्यांनी कॅपद्वारे, तर २ हजार ७७९ विद्यार्थ्यांनी राखीव कोट्याद्वारे प्रवेश घेतला. या शेवटच्या फेरीपर्यंत काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याने ३ ते ९ सप्टेंबर या कालावधीत विशेष फेरी राबवण्यात येणार आहे.

डॉ. पालकर म्हणाले, विशेष फेरीतील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. तसेच सुमारे ११ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला नव्हता. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यासाठी विशेष फेरी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ८ सप्टेंबर रोजी निवडयादी जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना ९ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

८ लाखांहून अधिक जागा रिक्त

राज्यातील ९ हजार ५३५ कनिष्ठ महाविद्यालयात यंदा २१ लाख ५९ हजार २३२ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी १३ लाख ४३ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे ८ लाखांहून अधिक जागा अद्यापही रिक्त आहेत.