पुणे : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे राज्यातील २३५ खासगी अनुदानित आश्रमशाळांना व्यावसायिक कपडे धुण्याचे यंत्र (वॉशिंग मशिन) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी विभागाकडून १३ कोटी ९९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. सद्य:स्थितीत विभागांतर्गत ९८० प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत.
विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील मुला-मुलींना पहिली ते बारावीपर्यंत मोफत शिक्षणासह मोफत निवास, भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा, क्रीडा सुविधा, शैक्षणिक साहित्य, अंथरुण-पांघरुण, भोजनाची भांडी इत्यादी सुविधा पुरवण्यात येतात. त्यासाठी संस्थांना वेतनेतर अनुदान देण्यात येते. आश्रमशाळांत प्रवेशित विद्यार्थी हे प्रामुख्याने निवासी आहेत.
आश्रमशाळा सुरू असलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांना स्वतःचे कपडे स्वतः धुण्यात मर्यादा येतात. विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेता त्यांना कपडे धुणे जिकिरीचे होते, त्यात त्यांचा बराच वेळ जातो. परिणामी, अभ्यास आणि मैदानी खेळांसाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र, कपडे स्वच्छ न धुतल्यास त्यात सूक्ष्म जंतू तयार होऊन विद्यार्थ्यांना त्वचेचे आजार होऊ शकतात.
या पार्श्वभूमीवर विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या निवासी आश्रमशाळांना व्यावसायिक कपडे धुण्याचे यंत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एकाच परिसरात असलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा असे एक युनिट विचारात घेऊन पहिल्या टप्प्यात ५८५ आश्रमशाळांपैकी ३५० आश्रमशाळांना अत्याधुनिक व्यावसायिक कपडे धुण्याचे यंत्र पुरवण्यात आले.
आता उर्वरित २३५ आश्रमशाळांनाही ते पुरवण्यात येणार आहे. त्यासाठी १३ कोटी ९९ लाख रुपये खर्च केले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यंत्रखरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले असून, कपडे धुण्याचे यंत्र ही शासकीय मालमत्ता समजून त्याची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, वसतिगृह अधीक्षक यांची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.