राज्यातील वीस हजार जवानांना तडकाफडकी काढल्याबद्दल असंतोष
आपत्कालीन परिस्थिती असो वा महत्त्वाचा बंदोबस्त असो, पोलिसांच्या बरोबरीने गृहरक्षक दलातील (होमगार्ड) जवान काम करतात. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेकदा त्यांची मदत घेतली जाते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील वीस हजार जवानांना गृहरक्षक दलातून टप्प्याटप्प्याने कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले आहे. पुणे शहर व जिल्ह्य़ातील सुमारे दोन हजार जवानांना कमी करण्यात आल्यामुळे राज्यातील होमगार्ड जवानांमध्ये असंतोष आहे. पोलिसांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या गणेशोत्सवाच्या बंदोबस्तावरच बहिष्कार घालण्याचा इशारा होमगार्डमधील जवानांनी दिला आहे.
होमगार्डमधील जवानांच्या व्यथा ‘लोकसत्ता’ने दोन महिन्यांपूर्वी मांडल्या होत्या. होमगार्डमधील जवानांच्या बैठका नुकत्याच पुणे, मुंबई आणि अमरावती येथे पार पडल्या. होमगार्डमधून काढून टाकण्यात आलेले जवान तसेच सध्या कार्यरत असलेले जवान या बैठकांमध्ये उपस्थित होते. या बैठकीत गणेशोत्सवाच्या बंदोबस्तावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती होमगार्डमधील जवानांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
होमगार्ड ही स्वयंसेवी शासकीय संस्था आहे. होमगार्डमध्ये काम करणारे जवान प्रशिक्षित असतात. देशप्रेमापोटी अनेक जण होमगार्डमध्ये भरती होतात. सन २०१२ पासून राज्यातील विविध जिल्ह्य़ांमधील होमगार्डच्या समादेशकांनी सेवाभावी होमगार्ड जवानांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्याचे धोरण अवलंबले आहे. समादेशक, प्रशासकीय अधिकारी व केंद्रनायकांनी केवळ द्वेष भावनेने ही कारवाई केली आहे. त्यासाठी त्यांनी खोटे पुरावेदेखील जोडले आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये राज्यातील महिला व पुरुष जवान मिळून अशा वीस हजार जणांना काढून टाकण्यात आले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, होमगार्डचे समादेशक आयपीएस अधिकारी राकेश मारिया, पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना वेळोवेळी निवेदने दिली. तसेच होमगार्डमधून काढून टाकण्यात आलेल्या जवानांकडून आंदोलनदेखील करण्यात आले. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, अशी माहिती जवानांनी दिली.
नैसर्गिक आपत्ती असो वा पोलीस बंदोबस्त असो, होमगार्डमधील जवान पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. गणेशोत्सव पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवातही पोलिसांच्या बरोबरीने होमगार्डमधील जवान बंदोबस्तात असतात. मात्र, वेळोवेळी सरकार दरबारी गाऱ्हाणे मांडून देखील आमच्याकडे लक्ष देण्यास शासनाला वेळ नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या बंदोबस्तावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असे जवानांनी सांगितले.
पुण्यातील गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. देशातूनच नव्हे, तर परदेशातून भाविक तसेच पर्यटक उत्सवाच्या काळात पुण्यात येतात. विविध मंडळाच्या मांडवाच्या परिसरात होमगार्ड जवान बंदोबस्तासाठी तैनात केले जातात. बेवारस वस्तू व संशयितांवर नजर ठेवण्याचे काम जवानांकडून केले जाते. घातपाती कारवायांच्या पाश्र्वभूमीवर डोळ्यात तेल घालून हे जवान बंदोबस्त पार पाडतात. होमगार्ड जवानांना दररोज ४०० रुपये भत्ता दिला जातो. मात्र जवान केवळ भत्त्यासाठी काम करत नाहीत. कर्तव्यभावनेने ते बंदोबस्त पार पाडतात, असे जवानांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात होमगार्डचे समादेशक राकेश मारिया यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government remove two thousand homeguard
First published on: 23-08-2016 at 04:02 IST