पुणे : ‘ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज मोहीम येत्या १७ सप्टेंबरपासून सुरू केली जाणार आहे. ही मोहीम शंभर दिवस राबविण्यात येणार आहे. त्यात अधिकाऱ्यांनी लोकसहभाग घेऊन सर्व घटकांना सोबत घेऊन कामे मार्गी लावावीत,’ असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
गणेश कला क्रीडा मंच येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राज्यस्तरीय कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ‘यशदा’चे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, पंचायत राज संचालक गिरीश भालेराव यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारच्या वतीने सेवा पंधरावडा साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून १७ सप्टेंबर पासून हे अभियान सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठीचे आवश्यकते नियोजन देखील पूर्ण करण्यात आले आहे.
या अभियानामध्ये ग्रामपंचायत सक्षमीकरणासाठी आवश्यक ते उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागासाठी असलेल्या विविध योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करावी यासाठी या अभियानात स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. १०० टक्के घरकुलांचा लाभ देणारे गाव, १०० टक्के आयुष्यमान भारत कार्ड देणारे गाव, स्मशानभूमी अशी कामे करणाऱ्या गावांना पुरस्कार दिले जाणार असल्याचे मंत्री गोरे यांनी सांगितले.
प्रत्येक तालुक्यात २० गावे निवडण्यात येणार आहेत. यातील १,९२० गावांना काही ना काही बक्षीस देण्यात येईल. चांगले काम करणारी जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनाही बक्षीस देण्यात येणार आहे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रधान सचिव डवले, डॉ. कलशेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात पंचायत विकास निर्देशांकामध्ये राज्यातील पहिल्या १० जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती व राज्यस्तरावरील टीमचा गौरवदेखील करण्यात आला.