पुणे : राज्यात डिसेंबरच्या सुरुवातीला पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल दीड लाख हेक्टरवरील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. यंदा द्राक्ष उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट येण्यासह निर्यातीसाठीच्या द्राक्षांचा तुटवडा भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदा डिसेंबरच्या सुरुवातीस पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वांत मोठा फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे. नाशिकमधील पंधरा हजार एकरवरील द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. त्या खालोखाल सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत मोठी हानी झाली आहे. पूर्व हंगामातील काढणीला आलेली द्राक्ष आणि फुलोरावस्थेत असलेल्या सुमारे १ लाख ५० हजार एकरांवरील द्राक्षबागा वाया गेल्या आहेत. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने म्हटले आहे.

हेही वाचा >>> राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ? उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून समिती नियुक्त

राज्यात सध्या ४.५० लाख एकरवर द्राक्षबागा आहेत. नैसर्गिक संकटे, अतिवृष्टीने दिवसेंदिवस द्राक्षबांगासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीला द्राक्षबागांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागला. त्यानंतर अवकाळीचा फटका बसला. नाशिकच्या सटाणा, मालेगाव, कळवण भागात काढणीला आलेल्या, निर्यातक्षम बागा गारपिटीमुळे जमीनदोस्त झाल्या. नाशिक, सोलापूर, पुणे आणि सांगली जिल्ह्यांत फुरोलावस्था आणि पोंगा अवस्थेत असलेल्या बागांमध्ये फळकूज, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन द्राक्षबागा हातच्या गेल्या आहेत, अशी माहिती तासगावमधील शेतकरी केशव काशीद यांनी दिली.

द्राक्ष निर्यातीवर विपरित परिणाम

देशातून युरोपीयन देशांना निर्यात होणाऱ्या द्राक्षापैकी ९८ टक्के द्राक्षांची निर्यात राज्यातून होते. २०२१ मध्ये युरोपीयन देशांत ७ हजार ९६४ कंटनेर द्राक्षाची निर्यात झाली होती. सन २०२२ मध्ये नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला होता. २०२३ मध्ये राज्यातून ७ हजार ८७४ कंटनेर द्राक्षे युरोपीय देशात गेली होती. यंदाच्या हंगामात अवकाळी आणि गारपीट झाल्याने राज्यातून द्राक्षाची निर्यात घटणार असल्याचा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे. नाशिक भागातील निर्यातक्षम द्राक्षबागा वाया गेल्या आहेत.

हेही वाचा >>> विवाहाचे आमिष दाखवून तब्बल १७ तोळे दागिने उकळले, बलात्काराचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारी मदत तोकडी

मागील चार वर्षांपासून द्राक्षबागा विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे अडचणीत आल्या आहे. यंदा गारपीट आणि अवकाळीने द्राक्षबागांचे सुमारे १५ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. सरकारकडून मिळणारी मदत अत्यंत तोकडी असते. एकीकडे उत्पादन खर्च वाढला आहे, दर स्थिर राहिले आहेत, त्यात अवकाळीची भर पडली आहे. १२० प्रति किलो निर्यातीला दर होता, तो थेट १०० रुपयांवर आला आहे. तरीही निर्यातीला द्राक्षे मिळत नाहीत, अशी सध्याची स्थिती आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिली.