पुणे : राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) धर्तीवर पुण्यात महाराष्ट्र विषाणूविज्ञान संस्था (एमआयव्ही) सुरू केली जाणार आहे. ‘या प्रयोगशाळेची उभारणी पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या आवारात करण्यात येणार असून, यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रयोगशाळेेचे लोकार्पण करण्यात येणार आहे,’ अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी दिली.

आबिटकर यांनी राज्य आरोग्य प्रयोगशाळेस गुरुवारी भेट दिली. त्या वेळी एमआयव्ही प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. ‘एनआयव्ही’च्या धर्तीवर राज्यासाठी ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. यामुळे जीवाणू अथवा विषाणू तपासणीसाठी आगामी काळात ‘एनआयव्ही’वर अवलंबून राहावे लागणार नाही. या प्रयोगशाळेत नियमित चाचण्यांव्यतिरिक्त विषाणूजन्य आजारांची तपासणी तपासणी केली जाणार आहे. विषाणूजन्य आजार चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी संशोधनही या प्रयोगशाळेत केले जाणार आहे.

आबिटकर म्हणाले, ‘एनआयव्ही ही राष्ट्रीय पातळीवरील संस्था आहे. या ठिकाणी तपासणीसाठी देशभरातून नमुने येत असतात. त्यामुळे या संस्थेवर मोठा ताण येतो. वेळेवर निदान होण्यास अडचणी येतात. यामुळे करोना संकटावेळी चाचण्यांसह तपासण्यांना विलंब झाला होता. त्यानंतर अलीकडेच पुण्यात आलेल्या गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) साथीवेळीही तपासण्यांचे अहवाल येण्यास उशीर झाला होता. हे टाळण्यासाठी राज्यात एमआयव्ही उभारण्यात येत आहे. यातून साथरोगांचे लवकर निदान होण्यास मदत होणार आहे. या प्रयोगशाळेत संशोधनही केले जाणार आहे.’

‘महाराष्ट्र हे मोठे राज्य असल्याने स्वतंत्र अत्याधुनिक प्रयोगशाळा असावी, असा विचार पुढे आला होता. राज्य आरोग्य प्रयोगशाळेत एमआयव्ही सुरू करण्याबाबत गुरुवारी पाहणी करून आढावा घेण्यात आला. या ठिकाणी ‘एमआयव्ही’ची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. पुढील सहा महिन्यांत या प्रयोगशाळेचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रयोगशाळेचे लोकार्पण केले जाईल,’ असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.

‘एनआयव्ही’प्रमाणेच राज्याची ‘एमआयव्ही’ सुरू केली जाणार आहे. आजारांचे वेळीच निदान आणि त्यावरील उपाययोजना या माध्यमातून शक्य होणार आहेत. संपूर्ण राज्यासाठीची ही ‘एमआयव्ही’ पुण्यात पुढील सहा महिन्यांत सुरू होईल. – प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री