पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीची स्पर्धा सुरु आहे. काही वेळातच आता अंतिम सामन्याची लढत होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे या अंतिम लढतीकडे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत पुण्याचा महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये झाली. मॅट विभागातून अंतिम लढत शिवराज राक्षे आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली होती. त्यात शिवराज राक्षेचा विजय झाला. तर माती विभागातील अंतिम लढत सोलापूरचा सिकंदर शेख आणि सोलापूच्या महेंद्र गायकवाड यांच्यात झाली होती, त्यात महेंद्रने सिकंदरला अस्मान दाखवले. अंतिम फेरीत शिवराज राक्षेने अगदी काही मिनिटांतच महेंद्र गायकवाडला चितपट करत महाराष्ट्र केसरीवर स्वतःचे नाव कोरले.

महाराष्ट्र केसरीसाठी महेंद्र विरुद्ध शिवराज

माती गटातील उपांत्य फेरीत महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखवर ६-४ असा विजय मिळवला होता. तर मॅट गटात शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरवर ८-१ असा एकतर्फी विजय मिळवला. दोन्ही विजेत्यांनी तुल्यबळ असा खेळ दाखविल्यामुळे अंतिम सामन्यातल्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या अंतिम फेरीत शिवराज राक्षे पहिल्या काही मिनिटांतच महेंद्र गायकवाडवर वरचढ ठरला आणि चितपट करत चांदीची गदा मिळवली.

महाराष्ट्र केसरी पाहा LIVE

नक्की वाचा – विश्लेषण : ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचे महत्त्व किती?

‘आम्ही टीव्हीच्या स्क्रिनवर कुस्ती खेळतो’

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावरुन राजकीय वाद उद्भवल्यानंतर अखेर पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेच्या समारोपाआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. यावेळी धर्मवीर संभाजीमहाराजांना अभिवादन करतो असे म्हणत या स्पर्धेचे नेटके आयोजन केल्याबद्दल पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केले.

फडणवीस पुढे म्हणाले, “लाल माती आणि मॅटवरचे पैलवान कुस्ती खेळतात. आम्ही देखील राजकारणात कुस्ती करतो. पण अलीकडच्या काळात आमची कुस्ती ही फक्त टीव्हीवरच्या स्क्रिनवर चालते. पण टीव्हीच्या स्क्रिनच्या कुस्तीवरूनही राजकारणातला महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो, हे आपण नुकतेच बघितले. पण त्याहीपेक्षा रंजक आणि आपल्या सर्वांना प्रेरणा देणारं महाराष्ट्र केसरी स्पर्धा याठिकाणी आयोजित झाल्या. अत्यंत चुरशीच्या अशा दोन्ही उपांत्य फेऱ्या झाल्या. अंतिम सामना देखील चुरशीचा होईल.”