पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) मैदानावर इमारत बांधली जाणार असल्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे गुरुवारी आंदोलन करण्यात आले. मैदानाच्या कोणत्याही भागात इमारत बांधण्यास तीव्र विरोध करण्यात आला. दरम्यान, प्रस्तावित इमारत मैदानाच्या एकूण क्षेत्रफळाच्या १५ टक्के भागावर उभारण्यात येणार असून, क्रीडा क्षेत्र सुरक्षित राहील, याची काळजी घेण्याचे नियोजन करण्यात आल्याचे लेखी स्पष्टीकरण डेक्कन एज्युकेशन सोसायटीने दिले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे प्रस्तावित इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम गुरुवारी ‘बीएमसीसी’च्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने या इमारतीच्या बांधकामात बीएमसीसीच्या मैदानाची जागा वापरली जाणार असल्याचा आक्षेप नोंदवून या बांधकामास विरोध दर्शवला. या आंदोलनावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अक्षय जैन, भूषण रानभरे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव आनंद दुबे, मेघश्याम धर्मावत, महेश म्हेत्रे आदी या वेळी उपस्थित होते.

शहरातील मैदाने झपाट्याने कमी होत आहेत. अशा वेळी संस्थेने इमारत बांधण्यासाठी उपलब्ध असलेली अन्य जागा वापरावी. मात्र, मैदानाची एक इंचही जागा वापरू दिली जाणार नाही. ही मागणी मान्य न केल्यास बीएमसीसीचे माजी विद्यार्थी, स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा जैन यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपकार्यवाह दीपक काळे यांनी लेखी स्पष्टीकरण दिले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित डीईएस पुणे विद्यापीठाची प्रस्तावित शैक्षणिक इमारत मैदानाच्या एकूण क्षेत्रफळाच्या १५ टक्के भागावर उभारण्यात येणार आहे. तसेच, प्रस्तावित बांधकामस्थळी २६ झाडांची तोड करणे, नियमानुसार झाडे लावून त्याचे संगोपन करणे याची जबाबदारी बांधकामाच्या निविदेमध्ये निश्चित केलेली आहे. बांधकाम करताना संस्थेच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या क्रीडांगणाचे कोणतेही नुकसान होऊ नये, याची पुरेपूर काळजी संस्थेने घेतली आहे. क्रिकेट, फूटबॉल अशा मैदानी खेळांच्या मानांकनानुसार आवश्यक क्रीडा क्षेत्र सुरक्षित राहील, याचे नियोजन केले आहे, असे नमूद करण्यात आले.