पुणे : राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीसाठी भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी १ लेखी, तोंडी, स्वाध्याय, प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार शाळास्तरावर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, कोणत्याही शाळेत भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी १ होणार नाही, असे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) स्पष्ट केले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १, संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार १० ते १३ ऑक्टोबर या कालावधीत संकलित चाचणी १ आयोजित करण्यात आली आहे.
या चाचणीअंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा, खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची चाचणी एकूण दहा माध्यमांत घेण्यात येणार आहे. या चाचणीसाठीच्या प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पुरवण्यात येणार आहेत.
डॉ. आवटे म्हणाल्या, ‘गणित, भाषा, इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांचा संकलित चाचणी १मध्ये समावेश आहे. त्यामुळे शाळास्तरावर या विषयांची स्वतंत्र परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही. हे विषय वगळून अन्य विषयांची शाळास्तरावर परीक्षा घेता येईल. संकलित चाचणीच्या वेळापत्रकाच्या पत्रात या सूचनेचा उल्लेख राहून गेल्याने स्वतंत्र परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.’
‘अपुऱ्या पुरवठ्याबाबत जबाबदारी निश्चित करावी’
‘नियतकालिक मूल्यांकन चाचणीच्या प्रश्नपत्रिका शाळांना अपुऱ्या पडत असल्याचे दिसून येते. अशा वेळी परीक्षा रद्द करणे किंवा छायांकित प्रती काढण्याची वेळ आली आहे. मात्र, आता मागणीप्रमाणे प्रश्नपत्रिका उपलब्ध न झाल्यास छायांकित प्रती काढण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे शाळांना प्रश्नपत्रिकांचा अपुरा पुरवठा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी. प्रश्नपत्रिकांबाबत प्रशासनाने प्रत्येक शाळेची त्यांच्या दप्तरी नोंद असलेली संख्या जाहीर करावी, ती संख्या योग्य-अयोग्य असल्याबाबत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाने योग्य त्या पुराव्यासह दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तरच अपुऱ्या प्रश्नपत्रिकांचा घोळ मिटेल,’ असे मत माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी व्यक्त केले.