पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ३३.९० टक्के, तर आठवीचा निकाल १९.३० टक्के लागला आहे.

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी अंतरिम निकालाबाबत माहिती दिली. परीक्षा परिषदेमार्फत पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा ९ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. राज्यभरातून पाचवीच्या ५ लाख ४६ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या ३ लाख ६५ हजार ८५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

अंतरिम निकालात काही आक्षेप, दुरुस्ती असल्यास गुणपडताळणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ४ मेपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव यात दुरुस्तीसाठी ४ मेपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइनव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने स्वीकारण्यात येणार नाही, तसेच मुदतीनंतरच्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरुस्ती करायची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंतीपत्र पूर्ण माहिती नमूद करून ईमेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे. गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ३० दिवसांत कळवण्यात येईल. गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.