कृष्णा पांचाळ, पिंपरी-चिंचवड

रस्त्यालगत पडलेल्या कचऱ्यातून भंगार, कागद, काच, पत्रे असं मिळेल ते गोळा करून त्यामधून मिळणाऱ्या पैशातून एका आजीने नातवाच्या शिक्षणाची धूरा समर्थपणे सांभाळली. नातवानेही आजीची हे मेहनत वाया जाऊ दिलेली नाही. तुषार साबळे असे मुलाचे नाव असून त्याने दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण मिळवले आहे. भविष्यात सॉफ्टवेअर इंजिनीअर व्हायचे आहे, असंही तुषार आत्मविश्वासाने सांगतो. तुषारने दहावीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

पिंपरी- चिंचवडमधील नेहरू नगर येथील राजीव गांधी माध्यमिक विद्यालयातील तुषार राजू साबळे याने दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण मिळवले आहे. तुषारचे हे यश पाहण्यासाठी त्याचे आई- वडील या जगात नाही. तुषार चार वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. काही वर्षांनी वडिलांनीही तुषारची साथ सोडली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. अखेर तुषारची आणि त्याच्या दोन बहिणींची जबाबदारी त्याच्या आजीकडे आली. आजी तुळसाबाई भिकाजी साबळे यांना शिक्षणाचे महत्त्व लक्षात आले होते. तुळसाबाई यांनी अथक परिश्रम करत तुषारला शिकवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या ३० वर्षांपासून तुळसाबाई या रस्त्यावरील कचऱ्यातून भंगार गोळा करुन विकत आहेत. साबळे कुटुंबाचे घर यावरच चालते. तुषारसह दोन नातीचे शिक्षण त्या पूर्ण करत आहेत. तुळसाबाई यांचे दिवसाचे उत्पन्न ठरलेले नाही. मात्र, त्यानंतरही तुळसाबाई यांनी जिद्दीने तुषार आणि त्याच्या दोन्ही बहिणींचे शिक्षण सुरु ठेवले आहे. तुषार आणि त्याच्या बहिणींच्या शिक्षणाकडे तुळसाबाईंचे विशेष लक्ष असते. तुषारला दहावीत ७० टक्के मिळाल्यानंतर तुळसाबाई यांच्या चेहऱ्यावरील समाधान दिसून येत होता.