पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्राची मुद्रित प्रत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. बारावीची पुरवणी लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलै या कालावधीत, तर दहावीची २४ जून ते ८ जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्राची प्रत मुद्रित केल्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र सदोष असल्यास त्यावर छायाचित्र चिकटवून त्यावर मुख्याध्यापक अथवा प्राचार्य यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रवेशपत्र असा शेरा देऊन प्रवेशपत्र उपलब्ध करून द्यावे.
प्रवेशपत्रातील नाव, आईचे नाव, जन्मतारीख अशा दुरुस्त्या असल्यास किंवा विषय, माध्यम बदल असल्यास विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून दुरुस्त्या करून घ्याव्यात, अशा सूचना राज्य मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.