पतीचे निधन झाल्यानंतर सदर महिलेसाठी विधवा हा शब्द वापरणे अपमानास्पद

पतीचे निधन झाल्यानंतर सदर महिलेसाठी विधवा हा शब्द वापरणे अपमानास्पद आहे, असे सांगत पूर्णांगी हाच शब्द महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारा आहे. यापुढे विधवा हा शब्द काढून टाकून त्याऐवजी पूर्णांगी हा शब्द कायमस्वरूपी वापरण्यात यावा, अशी शिफारस राज्य महिला आयोगाकडून सरकारकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी रविवारी चिंचवड येथे बोलताना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> खचून न जाता पुढील निवडणुकांच्या तयारीला लागा; शरद पवार यांची कार्यकर्त्यांना सूचना

दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चारचौघी या नाटकातील कलावंत, लेखक, दिग्दर्शक यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रातील महिलांच्या सत्कार चिंचवडला आयोजित करण्यात आला. यावेळी चाकणकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. प्रा. मोरे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, प्रसिध्द अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी आदी उपस्थित होते. उत्तरार्धात ज्येष्ठ पत्रकार राज काझी कलावंतांची मुलाखत घेतली. संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ (नाना) शिवले, कार्याध्यक्ष राजू करपे, उपाध्यक्ष संतोष बाबर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, माजी कार्याध्यक्ष सचिन साठे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात आमदार अश्विनी जगताप, कवयित्री संगीता झिंजुरके, राष्ट्रीय पुरस्कार विजेती बालकलाकार आकांक्षा पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला.

चाकणकर म्हणाल्या की, १७५ वर्षापूर्वी जोतिबांच्या सावित्रीने स्त्री शिक्षणाचा पाया रचला. दुर्दैवाने सावित्रीमाईचं आम्हाला कितपत समजल्या हा प्रश्न आहे. अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी योगदान दिले, लढा दिला, परंतु महाराष्ट्र बदलला नाही. आमची वेशभूषा बदलली. घर, गाड्या, रस्ते बदलले. परंतू आमच्यातील माणूस बदलला नाही, ही खरी शोकांतिका आहे. स्त्रियांचे प्रश्न वर्षानुवर्ष कायम आहेत. समाज कितीही पुढारलेला वाटत असला तरी स्त्रियांचे मूळ प्रश्न कायम आहे. आपल्या समाजात मुलींच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करताना आम्ही काटकसर करतो. मात्र हुंड्यासाठी आम्ही कर्ज काढतो. शिक्षण आणि तिचे कर्तृत्व ह्याच गोष्टींना महत्त्व दिले गेले पाहिजे. महिलांना पुरुषांमुळेच त्रास होतो असे नाही, तर महिलाच महिलांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे.

आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या, महिला सक्षमीकरणासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. अनेक कर्तबगार महिलांनी मी सबला आहे, असे सिध्द केले आहे. महिलांना समर्थ, सक्षम करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे.

हेही वाचा >>> सूस खिंडीत मालवाहू ट्रकचा अपघात ; अग्निशमन दलाकडून दोघांची सुटका

मालिकांमध्ये महिलांचे चित्रण चुकीचे चारचौघी नाटकावरील चर्चासत्रात बोलताना कलावंतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी यांनी चर्चेत सहभाग घेतला. ज्येष्ठ पत्रकार राज काझी यांनी सर्वांना बोलते केले. रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या की महिलाच महिलांचे पाय ओढतात, खच्चीकरण करतात, अशा आशयाचे चित्रण सध्या केले जाते. हे वैयक्तिकरीत्या मला मान्य नाही. कल्पंनाचा दुष्काळ पडला की काय अशी शंका वाटू लागते. कादंबरी कदम म्हणाल्या की, मी भाग्यवान आहे की मला माझे सासरे वडील म्हणून मिळाले. स्वतःच्या मुलीची काळजी घ्यावी, अशा पद्धतीने सुनेशी वागणारे सासरे दुर्मिळच आहेत. पर्ण पेठे म्हणाल्या, कलाक्षेत्राची खरी गंमत ही असते की आपण रंगमंचावर काहीतरी करत असतो. दुसऱ्या बाजूला आपलं आयुष्य सुद्धा असतं‌. आपली कला आणि आपलं आयुष्य कधी एकत्र होऊन जातं, हे सांगता येत नाही. मुक्ता बर्वे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना चिंचवडकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, प्रेक्षकांची प्रतिक्रिया ही चांगली किंवा वाईट असते असं नाही. टाळी घेतो तेव्हा छान वाटतं, कौतुक केलं की जसा उत्साह वाटतो. तसंच प्रतिक्रिया ही सकारात्मक घ्यावी, ती डोक्यात ठेवून पुढे काम करावे. लेखक प्रशांत दळवी म्हणाले, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात. सुखवस्तू घरातील अनेकांचे अर्थार्जनाचे प्रश्न सुटलेले असतात, परंतु आयुष्याचे प्रश्न मात्र कायम असतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra state commission for woman rupali chakankar recommended new word for widow zws 70 kjp
First published on: 05-03-2023 at 20:23 IST