पुणे :‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेतून सौर कृषिपंप बसविताना नेमण्यात आलेल्या ‘एजन्सी’कडून शेतकऱ्यांना वाहतूक खर्च किंवा अन्य साहित्याची मागणी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सौर कृषिपंप बसविण्याच्या कामाची संपूर्ण जबाबदारी संबंधित ‘एजन्सी’ची असून, अशा प्रकारची मागणी झाल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची रक्कम भरून पंप बसविणाऱ्या ‘एजन्सी’ची निवड केली की त्या शेतकऱ्याचे नाव प्रतीक्षा यादीत समाविष्ट होते. यादीनुसारच पंप बसविण्यात येतात. शेतकऱ्यांनी ज्या क्रमाने नोंदणी केली, त्या क्रमानेच पंप बसवून देण्यात येत आहेत. प्रतीक्षा यादी बदलून किंवा इतरांना डावलून पंप देण्यात येत नाहीत. शेतकऱ्यांनी नोंदणी करताना आपल्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर पंप बसविण्यासाठी नंतर पैसे भरण्याची गरज नाही,’ असे महावितरणकडून सांगण्यात आले.

बनावट संदेशांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक

‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत प्रतीक्षा यादी डावलून आधी पंप बसवून देतो, असे बनावट संंदेश आले असून, संबंधितांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या आहेत, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली. अशा प्रकारचे संदेश आल्यास शेतकऱ्यांनी महावितरणच्या १८०० २३३ ३४३५ किंवा १८०० २१२ ३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क करून तक्रार करावी. तसेच महावितरणच्या जवळच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून शंकेचे निरसन करावे, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतात सौर कृषिपंप बसविताना काही ठिकाणी संबंधित ‘एजन्सी’कडून शेतकऱ्यांकडे वाहतूक खर्च किंवा अन्य साहित्याची मागणी झाल्याच्या तक्रारी महावितरणकडे आल्या आहेत. सौर कृषिपंप बसविण्याबाबत संपूर्ण कामाची जबाबदारी संबंधित ‘एजन्सी’ची असल्याने शेतकऱ्यांनी अशा प्रकारे साहित्याची मागणी झाल्यास त्याची दखल घेऊ नये. संबंधितांची महावितरणकडे तक्रार करावी. – भारत पवार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण