सध्याच्या काळामध्ये लग्नाची व्याख्या बदलायला हवी. अन्यथा बलात्कार आणि व्यभिचार हे होतच राहणार. त्याला पर्याय नाही. सर्वानाच मुलगा हवा असल्याने स्त्री-भ्रूणहत्या होत आहेत. हे प्रमाण थांबवून मुलीच्या जन्माचे स्वागत करायला हवे. स्त्री-पुरुष गुणोत्तरामध्ये वाढ झाली तरच हे प्रकार कमी होतील, असे मत ज्ञानपीठ पुरस्काप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी शनिवारी व्यक्त केले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मॅजेस्टिक बुक गॅलरीचे उद्घाटन भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे आणि प्राची गुर्जर-पाध्ये यांनी नेमाडे यांची मुलाखत घेतली. मॅजेस्टिकचे अशोक कोठावळे, ज्येष्ठ समीक्षक प्रा. विलास खोले आणि संजय भास्कर जोशी या वेळी उपस्थित होते.
द्रौपदीला पांडव म्हणजेच पाच पती होते हा दाखला देत नेमाडे म्हणाले, मोकळ्या संबंधांची परंपरा पुरातन काळापासूनच आहे. मात्र, नंतर विवाहाची व्याख्या काळानुरूप बदलली नाही. सध्याच्या काळात विवाहित नवरा आणि बायकोला एक प्रेयसी आणि प्रियकर असायला काय हरकत आहे. स्त्री-पुरुष गुणोत्तराचे प्रमाण बदलल्याखेरीज बलात्कार आणि व्यभिचाराचे प्रमाण कमी होणार नाही.
मी लिहितो ते बोचणारे, टोचणारे असते. त्यामुळे मी काही लाडका लेखक नाही. तरीही दाभोलकर आणि पानसरे यांच्याप्रमाणे मला परलोकात पाठविले गेले नाही हे नशीबच आहे. मलाही निनावी पत्रे येतात. मात्र, त्यामध्ये मला प्रदीर्घ आयुष्य लाभावे अशा आशयाची ती असतात. सतत परखड भूमिका घेतली तरी सर्वाशी प्रेम सांभाळून आहे. मात्र, शेतकऱ्याचा मुलगा असूनही शेतीविषयक लेखन करू शकलो नाही याची लाज वाटते, असेही नेमाडे यांनी सांगितले.
कवी असल्याशिवाय लेखक होता येत नाही. कविता ही नेणिवेत असते. कोणतीही कविता खरी असते. ती अश्लील नसते. कविता येत असूनही ती केली नाही हा माझा नीचपणा आहे. कवी पोटासाठी काही काम करतो यावर समाजाचा विश्वास नसणे हे दुर्दैवी आहे. कविता करणे सोपे असले तरी तुकाराम आणि कबीर यांच्यासारखे धैर्य नाही, अशी कबुलीही नेमाडे यांनी दिली.

साधना साप्ताहिकातून ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी नेमाडे यांच्यावर टीका केली होती. हे विचारले असता ‘कसबेंना काही कळत नाही. ते फक्त वाचतात’, असा टोला नेमाडे यांनी लगावला. मी जातीव्यवस्थेचे समर्थन करत नाही. मात्र, जाती काय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. जातीअंताला कधीही यश मिळत नाही. जातीव्यवस्थेविरोधात बोलणारा पुरोगामी ठरतो. मात्र, जातींमुळेच समाजातील एकोपा टिकून आहे. आपल्याइतका एकोपा जगामध्ये कोठेही नसल्याचे नेमाडे यांनी स्पष्ट केले.