दिलीप माजगावकर यांचे मत

पुणे : चोख व्यवहार केला तर प्रकाशन व्यवसाय कधीही अडचणीत येणार नाही, असे मत ‘राजहंस प्रकाशन’चे दिलीप माजगावकर यांनी रविवारी व्यक्त केले. इंटरनेट माध्यमाच्या प्रभावामुळे प्रकाशकांनी निराश होण्याचे कारण नाही. वाचकांना पुस्तके हवी आहेत. वेगवेगळ्या योजना घेऊन त्यांच्यापर्यंत पुस्तके घेऊन जाण्याची जबाबदारी प्रकाशकांची आहे, असेही त्यांनी सांगितले.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते माजगावकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार आणि ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना ‘साहित्यसेवा कृतज्ञता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी प्रभावळकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून माजगावकर यांचा प्रकाशन व्यवसायातील अर्धशतकाचा प्रवास उलगडला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आणि उपाध्यक्ष दत्तात्रय पाष्टे या वेळी उपस्थित

होते.

माजगावकर म्हणाले,की श्रीगमा यांचा मदतनीस म्हणून कामाला सुरुवात के ली. मुंबईत जाहिराती आणि लेखकांना भेटून मजकूर जमा करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यामुळे प्रयोगशील लोकांच्या सहवासात राहता आले. हे लिहितात काय, वाचतात काय, तसेच त्यांच्या लेखनाचे बलस्थान हे जाणून घेता आले. ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथामुळे ‘राजहंस’ला प्रतिष्ठा मिळाली. १९६० ते ८५ हा मराठी साहित्याचा बहराचा काळ होता. नवे प्रयोग घडत गेले. नवकथा पुरेशी स्थिरावली होती.

वाङ्मयीन नियतकालिके होती. दलित साहित्याने दमदार प्रयोग केले. नाटके लक्ष वेधून घेत होती. साहित्यिक, सांस्कृतिक पर्यावरणाच्या घुसळणीचा माझ्यावर परिणाम झाला.

सकस लेखन टिकणारे

सकस लेखन टिकते असा अनुभव आहे. समाजमाध्यमांवर सुरुवातीला उत्साहाने लिहिणारे आता गंभीर लेखन करू लागले आहेत. पूर्वी मासिके करत होती तेच काम आता इंटरनेट करत आहे, असे दिलीप माजगावकर यांनी सांगितले. आपल्याकडे काय ऐवज आहे याची कल्पना बऱ्याचदा प्रकाशकांना नसते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.