पुणे : ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे (वय ७८) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. नाट्यसृष्टीत ते भावेकाका म्हणून परिचित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूळचे साताऱ्याचे असलेले भावे यांना लहानपणापासून नाटक, संगीत, साहित्याची आवड होती. मात्र साताऱ्यात त्यांच्या कलेला पुरेसा वाव नसल्याने ते पुण्यात आले. सुरुवातीच्या काळात नोकरी करत त्यांनी एकांकिका, नाटकांच्या रंगभूषेचे काम सुरू केले. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी मराठी नाट्यसृष्टीत रंगभुषाकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. महाराष्ट्रातील जवळपास सर्व नावाजलेल्या नाट्य स्पर्धांशी ते रंगभूषाकार म्हणून संबंधित होते. मुखवटे तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता. रंगभूषा नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले.  पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते त्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. या पुस्तकाला राज्य सरकारचा त्या वर्षीचा पुरस्कार मिळाला होता.  

हेही वाचा – निगडीतील महिलेच्या हत्ये प्रकरणी ११ वर्षांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

चेहऱ्याला केवळ रंग लावणे म्हणजे रंगभूषा नाही. भूमिकेनुसार रंगांचा वापर करणे आणि त्यासाठी कमीत कमी रंग वापरणे महत्त्वाचे असते. रंगांचा अतिरेक झाला तर नाटक फसते, अशी भावे यांची धारणा होती. रंगांच्या माध्यमातून व्यक्तिरेखा उभी करता येत नाही, पण व्यक्तिरेखेनुसार योग्य रंगभूषा करता आली तर कलाकार खुलतो. त्याचा परिणाम अभिनयावर होतो. म्हणून रंगभूषा हा नटाला खुलवणारा मानसोपचारच वाटतो, अशी त्यांची भूमिका होती.

तरुण कलावंतांमध्ये रंगभूमीवरील ‘भावेकाका’ अशी ओळख असलेले प्रभाकर भावे अनेक वर्षे पुरुषोत्तम स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची रंगभूषा करत  होते. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makeup artist prabhakar bhave passed away pune print news ccp 14 ssb
First published on: 10-01-2023 at 12:05 IST