पिंपरी : पार्टीसाठी फार्महाऊसमध्ये आलेल्या एकाने पिस्तुलातून दोनवेळा हवेत गोळीबार केल्याची घटना सुसगाव येथे उघडकीस आली. याप्रकरणी दिनेश बाबुलाल सिंह (वय ४०, रा. मामुर्डी, देहूरोड) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत देवराम दिनेश वर्मा (वय २४, रा. सुसगाव) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश याने पार्टीदरम्यान स्वतःकडील पिस्तुलमधून दोन वेळा हवेत गोळीबार केला. यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली. तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दिनेश याला अटक केली आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.
भोसरीत पिस्तूलासह तरुणास अटक
पिस्तुल घेऊन आलेल्या एका तरुणास पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (१० जुलै) दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास बैलगाडा घाट, भोसरी येथे केली.
अविनाश महादेव जाधव ( वय २८, लांडेवाडी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई सचिन मोरे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास भोसरीतील बैलगाडा घाटाजवळ अविनाश हा २१ हजार रुपये किंमतीचे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुसे बाळगत असल्याचे आढळून आले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
रहाटणीत तरुणावर कोयत्याने वार
दुचाकीवरून कामावर चाललेल्या तरुणास रस्त्यात थांबवून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना रहाटणी येथे बुधवारी (९ जुलै) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. तुषार राजू पुलावळे (२१, थेरगाव) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी गुरुवारी (१० जुलै) काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार हे दुकानात कामावर जात असताना रहाटणी येथे आरोपींनी त्यांना थांबवून शिवीगाळ केली. त्यानंतर कोयत्याने डोक्यावर व कपाळावर वार करीत गंभीर जखमी केले. आरोपींच्या साथीदारांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा कोयत्याचा वापर वाढला आहे. कोयत्याने हल्ल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कोयत्याने हल्ले केल्याचे गुन्हे दररोज दाखल होत आहेत. त्यामुळे कोयता गँग रोखण्याचे पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर आव्हान आहे.