लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: अवैधरीत्या जवळ पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने तळजाई टेकडी परिसरातून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले आहे.
गगन सतीश लाड (वय २३, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहरातील सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गुन्हे शाखेचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान, सहकारनगर भागातील तळजाई टेकडी येथील सार्वजनिक रस्त्यावर एकजण संशयितरित्या उभा असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती युनिट दोनचे अंमलदार गजानन सोनुने, उज्ज्वल मोकाशी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित लाड याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तूल आणि एक काडतूस आढळून आले. पोलिसांनी लाड याला अटक केली. पुढील कारवाईसाठी आरोपीला सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आणखी वाचा- पुणे: खरेदी-विक्रीपासून नाव नोंदणीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया एका क्लिकवर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वैशाली भोसले, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, अंमलदार विनोद चव्हाण, उत्तम तारू, विजय पवार, शंकर नेवसे, नागनाथ राख, साधना ताम्हाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.