कोकणात फिरायला जाण्यासाठी पैसे न दिल्याने एकाने आईच्या डोक्यावर कोयत्याने वार केल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुलास अटक केली आहे. ईश्वर प्रकाश गलांडे (वय ३८, रा. नवरत्न सोसायटी, प्रकाश निवास, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.
आई नंदा प्रकाश गलांडे (वय ६६) यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ईश्वरला कोकणात फिरायला जायचे होते. त्याने आई नंदा यांच्याकडे पैसे मागितले. नंदा यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्याने रागाच्या भरात आई नंदा यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली तसेच त्यांना मारहाण केली.
ईश्वरने घरात ठेवलेल्या कोयत्याने त्यांच्या डोक्यावर वार केले आणि पसार झाला. या घटनेत नंदा गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करत आहेत.