लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कर्जबाजारी झाल्याने तरुणाने पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली. कात्रज घाटात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांला तातडीने रुग्णालयात दाखल केले. कात्रज घाटात चोरट्यांनी अडविले. पैसे न दिल्याने चोरट्यांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची माहिती तरुणाने पोलिसांना दिली.

आणखी वाचा-संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराड सीआयडी पोलिसांना शरण, कार्यालयाबाहेर अखंड मराठा समाजाच आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. कात्रज घाटातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. तरुणाने दिलेली माहिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली. चौकशीत कर्जबाजारी झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती त्याने दिली. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित तरुणाने बाळगलेले देशी बनावटीचे पिस्तूल कोठून आणले, यादृष्टीने तपास सुरू आहे, असे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.