लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गाव परिसरात एका घरावर दरोडा टाकून चोरट्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. महिलांना मारहाण करुन पसार झालेल्या चोरट्यांना ग्रामीण पोलिसांनी येरवडा परिसरातून अटक केली.

विश्वजीत शशिकांत चव्हाण (वय ३३, रा. निळकंठेश्वर मंदिराजवळ, सहकारनगर, यवत, ता. दौंड, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सलमान दिलशाद शेख (वय २८), मोमीन अकबर शेख (वय ४५, दोघे रा. पठाणकोट मोहल्ला, जि. बागपत, उत्तर प्रदेश), रावतसिंग चौधरी जगजीतसिंग तोमर (वय २६), गुलशन उर्फ मोटा जहाँगीर खान (वय २५, दोघे रा. बडौत, जि. बागपत, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली. आरोपी यवत परिसरात एका गुऱ्हाळात गूळ तयार करण्याचे काम करत होते.

बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास यवत गावातील निळकंठेश्वर मंदिराजवळ राहणारे विश्वजीत चव्हाण यांच्या घरात आरोपी शेख, तोमर, खान शिरले. आरोपींनी चव्हाण यांना बेदम मारहाण केली. चोरट्यांनी दोन महिलांसह चैाघांना मारहाण केली. चव्हाण यांच्या घरातील ऐवज लुटून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती विश्वजीत चव्हाण यांची पत्नी सारिका यांनी यवत पोलिसांना दिली.

सारिका यांनी आरडाओराड केला. चोरटे रेल्वे रुळाच्या बाजूने पसार झाले. चव्हाण कुटुंबीयांचा आवाज ऐकून नागरिक जागे झाले. त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. चोरटे अंधारात पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक गणेश दडस, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी येरवडा परिसरातून खासगी बसने उत्तर प्रदेशात पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने चौघांना सापळा लावून पकडले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, राहुल गावडे, प्रवीण सपांगे, सुवर्णा गोसावी, अभिजित सावंत, अमित सिद-पाटील, किशोर वागज, सलीम शेख, सहायक फौजदार ईश्वर जाधव, हनुमंत पासलकर, बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे, असिफ शेख यांनी ही कामगिरी केली.