पिंपरी : चिखलीतील कृष्णानगर चौक ते चेरी चौक या मुख्य रस्त्यावर एकाचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. महेश चामे (रा. नवचैतन्य सोसायटी, चिखली, मूळ लातूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश हे मोबाइल स्क्रीन गार्ड विक्रीचा व्यवसाय करीत होते. ते रस्त्यालगत दुकान लावायचे. गुरुवारी सकाळी कृष्णानगर चौक ते चेरी चौक या मुख्य रस्त्याच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती चिखली पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, महेश गंभीर जखमी असल्याचे समोर आले. त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महेश यांचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले. हा खून कोणी, का, केला याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले. तसेच, आरोपींबाबत माहिती मिळाली असून, पोलीस त्यांच्या मागावर असल्याचेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.