पुणे : कौटुंबिक वादातून साडूचा खून करून मृतदेह वरंधा घाटात टाकण्यात आला. बेवारस अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना अटक केली संतोष ऊर्फ प्रमोद रघुनाथ पासलकर (वय ४०, रा. सोनल हाइट्स, वडगाव बुद्रुक) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संतोष भिकू पिसाळ (वय ४३, रा. साई प्लॅनेट, वडगाव बुद्रुक, मूळ रा. रांजे, ता. भोर), अनिकेत चंद्रकांत पिसाळ (वय २९, रा. अनंतसृष्टी, आंबेगाव खुर्द) यांना अटक करण्यात आली.

संतोष पासलकर आणि संतोष पिसाळ हे साडू आहेत. पासलकर काही काम करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन आहे. पासलकर दारू पिऊन पत्नीला मारहाण करायचा. पासलकर आणि पिसाळ हे जवळच राहत होते. पासलकर दाम्पत्यातील भांडण सोडविण्यासाठी पिसाळ मध्यस्थी करायचा. ही बाब पासलकरला खटकत होती. २३ एप्रिल रोजी पासलकरने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर पिसाळ भांडण सोडविण्यासाठी घरी गेला. रात्री सोसायटीच्या वाहनतळावर त्यांच्यात वाद झाला. पिसाळ आणि त्याचा नातेवाईक अनिकेत पिसाळ यांनी पासलकरला मारहाण केली. पासलकर गंभीर जखमी झाला. त्यानंतर पासलकर मरण पावल्याची खात्री केल्यानंतर त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरविले.

मोटारीत पासलकरचा मृतदेह टाकून ते भोर परिसरातील वरंधा घाटात आले. वरंधा घाटातील निर्जन ठिकाणी पासलकरचा मृतदेह टाकून आरोपी पिसाळ पसार झाले. घाटात गुरांना घेऊन जाणाऱ्या एकाने मृतदेह पाहिला. मृतदेहाला शिर नव्हते. तसेच प्राण्यांनी मृतदेहाचे लचके तोडल्याचे उघडकीस आले. याबाबतची माहिती पोलीस पाटील सुधीर रामचंद्र दिघे (वय ५२, रा. वारवंड, ता. भोर) यांना कळविण्यात आली. दिघे यांनी याबाबत भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशयावरून पोलिसांनी पिसाळला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत पिसाळने खुनाची कबुली दिली. पासलकरच्या कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते, सहायक फौजदार हनुमंत पासलकर, हवालदार अमाेल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, धीरज जाधव, धर्मवीर खांडे यांनी ही कामगिरी केली.