पुणे : ‘आचार्य अत्रे निर्भीड आणि समतोल वृत्तीचे होते. त्यांची ‘झेंडूची फुले’ आजही टवटवीत आहेत. अत्र्यांनी समाजातील विसंगतीवर बोट ठेवले. त्यांनी समकालीन राजकारणावर, राजकीय नेत्यांवर परखड टीका केली. मात्र, आज त्याची कल्पनाही करता येणार नाही,’ असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले. ‘‘नेहरू काका, मुंबई आई आहे आमची, नाही कुणाच्या बापाची’ अशा परखड राजकीय कविता करूनही त्यांना ‘वैर’ सहन करावे लागले नाही,’ अशी आठवण त्यांनी सांगितली.

पुणे नगर वाचन मंदिर आणि आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गोडबोले यांनी ‘झेंडूची फुले’ या विषयावर भाष्य केले. प्रतिष्ठानचे बाबूराव कानडे, ‘पुणे नगर वाचन मंदिर’चे अध्यक्ष मधूमिलिंद मेहंदळे, संगीता पुराणिक, स्मिता पांडे, गौरी कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांना ‘आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’, संदेश कुलकर्णी यांना ‘उत्कृष्ट नाटककार पुरस्कार’ आणि शिवराज वायचळ यांना ‘उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

गोडबोले म्हणाल्या, ‘अत्रे यांचे व्यक्तिमत्त्व प्रचंड होते. प्रचंड प्रतिभेच्या अत्र्यांनी मराठी भाषेला प्रचंडत्त्व दिले. त्या काळच्या समकालीन राजकीय नेत्यांवर आचार्य अत्र्यांनी केलेल्या चेष्टा आणि विडंबनाची आज आपण कल्पनाही करू शकत नाही. अत्र्यांनी त्यांच्या काळातील क्लिष्ट कविता, समाजातील विसंगती आणि राजकीय नेते यांचा भरपूर समाचार घेतला. त्यांनी समाजातील अपप्रवृत्तींवर जोरदार प्रहार केला. अत्रेंची परखड आणि निर्भीड पत्रकारिता आजही आदर्श आहे.’

नानिवडेकर म्हणाल्या, ‘अत्रे यांनी केलेली परखड आणि स्पष्ट पत्रकारिता आगामी काळात करता येईल का, याबाबत साशंकता वाटते. अत्र्यांनी स्वतःचे विचार प्रखरतेने मांडले. त्या काळात एखादे मराठी दैनिक सुरू करणे अवघड होते. मात्र, अत्रेंनी ‘दैनिक मराठा’ सुरू केले. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्राला विजय तेंडुलकर आणि शांता शेळके यांच्यासारखी रत्ने दिली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळही ‘मराठा’मुळे राज्यभरात पोहचवली आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली.’

‘आचार्य अत्रे यांनी मराठी भाषेचा प्रांत निर्माण केला. त्यांनी साध्या, सोप्या आणि प्रेमळ, त्याचबरोबर सुसंगत भाषेत लेखन केले. त्यांच्याकडे गुणग्राहकता होती. त्यामुळे त्यांना अनेकांना अनेक पदव्या बहाल करणे जमले. समाजात दुर्लभ झालेले ‘हसणे’ हा प्रकार अत्र्यांनी प्रचलित केला,’ असे कानडे यांनी सांगितले.

संगीता पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. स्वाती ताडफळे यांनी आभार मानले.