नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करणाऱ्या मारेक ऱ्यांना माजी पोलीस अधिकारी मनोहर कदम यांनी प्रशिक्षण दिल्याचा संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) व्यक्त केला आहे.
मुंबईतील घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकरनगर येथे १९९७ मध्ये झालेल्या दंगलीत तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम यांनी गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. त्या गोळीबार प्रकरणात कदम यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. २००९ मध्ये कदम यांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देऊन कदम यांना जामीन मंजूर केला होता. गोव्यातील मडगांव येथे बाँबस्फोट घडविणारा फरार आरोपी सारंग अकोलकर याच्या ई-मेलमध्ये कदम यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे कदम यांनी डॉ. दाभोलकर यांच्या मारेक ऱ्यांना पिस्तूल हाताळण्याचे तसेच चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचा संशय सीबीआयला आहे. सीबीआयने १ जून रोजी शनिवार पेठेतील एका सोसायटीतील सारंग अकोलकर याच्या घरावर छापा टाकला होता.सनातनच्या पनवेल येथील आश्रमावरही छापा टाकण्यात आला होता.
सीबीआयने तेथून दोन ई-मेलच्या प्रती जप्त केल्या आहेत. त्यापैकी पहिल्या ई-मेलमध्ये हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी पंधरा हजारजणांची फौज उभारण्यासंबंधीची तसेच फोंडा येथील प्रशिक्षण शिबिराची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या ई-मेलमध्ये मनोहर कदम यांच्या मोबाईल क्रमांकाचा उल्लेख आहे. अकोलकर याच्या ई-मेलची पडताळणी सुरू आहे.
तीन अधिकाऱ्यांची चौकशी
सीबीआयकडून आणखी तीन पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोघे अधिकारी पोलीस दलातून निवृत्त झाले आहेत, तर एकजण पोलीस सेवेत आहे. चौकशीत त्यांची भूमिका स्पष्ट होईल. एका अधिकाऱ्याने सनातन संस्थेला काही माहिती दिल्याचा संशय आहे. सरकारकडून सनातनवर काय कारवाई करण्यात येत आहे, याबाबतची माहिती त्याने दिल्याचा संशय सीबीआयला आहे.
दरम्यान, दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय पथकाने अटक केलेला डॉ. वीरेंद्र तावडे हा कोल्हापुरात १३ जणांच्या वारंवार संपर्कात असल्याचे शनिवारी पोलीस तपासात समोर आले आहे.